कलाकार हे सोशल मीडियावरून त्यांच्या आयुष्यातील अनेक खास प्रसंगे व किस्से शेअर करत असतात.पण कलाकार म्हटलं की, कौतुकाबरोबर ट्रोलिंगदेखील आलंच. काही कलाकार सोशल मीडियावरील या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतात. पण काही कलाकार मात्र या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देतात. यांपैकीच एक नाव म्हणजे ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंडिंग रील शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात आणि यावर त्यांना होणाऱ्या ट्रोलिंगबद्दलही भाष्य करत असतात. अशातच त्यांनी ‘आरपार’ला मुलाखत दिली ज्यात त्यांनी या ट्रोलिंगबद्दल पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. या मुलाखतीत ऐश्वर्या यांनी ट्रोलिंग ही एक विकृती आहे आणि यासाठी कठोर कायदे नसल्याचे म्हटलं. (aishwarya narkar on troll)
याबद्दल बोलताना त्यांनी असं म्हटलं की, “समाजात ही विकृती आहेच. यात कुणीच समोरासमोर येत नाही. यात आपण कुणाला काहीही बोलू शकतो. यामुळे अनेकांना आनंद मिळतो. मला असं वाटतं की माझ्या पातळीला हे खूप कमी आहे. काही आवडलं नाही तर त्याबद्दल एखाद्याला सांगणे ही वेगळी गोष्ट आहे पण त्याच्यावर खालच्या पातळीला जाऊन टीका करणे हे चूकच आहे. त्याने किंवा तिने काय करावं हे ज्याचे त्याने ठरवावे. यावर तुम्ही वाट्टेल ते बोलून त्याचं-तिचं मानसिक स्वास्थ्य बिघडवणे हे खूप चूक आहे”.
आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं थाटामाटात डोहाळे जेवण, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “या सगळ्यात वाईट म्हणजे या सगळ्यासाठी आपल्याकडे काही कायदा नाही किंवा पोलिसही यात काही करु शकत नाही. आपण फक्त त्या व्यक्तीला ब्लॉक करु शकतो. पण याने काहीच होणार नाही. या ट्रोलिंग करणाऱ्यांमध्ये बायकाही खूप असतात. खरंतर बाईने बाईला पाठिंबा दिला पाहिजे. पण तसं नाही होत. मी एक रील व्हिडीओ पोस्ट केला होता, ज्यात मी स्लीवलेस ब्लाऊज घातला होता. त्याच्यावरुन मला लोकांनी शिव्या घातल्या होत्या की, ते वाचून मला असं झालं होतं की आता यांच्या घरातल्या लेकी सुनांचं काय होत असेल. काय आपली मराठी संस्कृती, काय आपले दंड दाखवायचे असं लिहिलं होतं.
आणखी वाचा – “एजे तिळासारखे कडू आणि…”, लीलाचा एजेंसाठी हटके उखाणा, म्हणाली, “आमच्या लुडबूड करणाऱ्यांची…”
यापुढे ऐश्वर्या नारकर असं म्हणाल्या की, “मग सीतेने कंचुकी वापरल्याच ना. तेव्हा ती फॅशन नव्हती, तेव्हा ती गरज होती. आपल्याकडे आता जरी फॅशन म्हणून आली असेल तरी असं काय उघडं नागडं कोणी फिरलेलं नाही आणि जे कोणी फिरत असतील तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. अशाच बायकांच्या अकाऊंटला फॉलोवर्स असतात. कारण, तेच बघायला आवडतं. पण ही विकृती आहे. हे कुठे तरी थांबलं पाहिजे. सोशल मीडिया हे खूप छान आहे, यातून खूप छान गोष्टी सुरु होऊ शकतात”.