अभिनेता सिद्धार्थ चांदेकर व अभिनेत्री मिताली मयेकर ही जोडी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सिद्धार्थने त्याची आई सीमा चांदेकर यांचं दुसरं लग्न लावून दिलं तेव्हाही यावरून चांगलीच चर्चा रंगली होती. सिद्धार्थची आई सिंगल मदर होती. परंतु सीमा यांनी त्यांच्या जीवनाची नवीन सुरुवात केली असून सिद्धार्थच्या आईने दुसरं लग्न केलं. (Siddharth-Mitali On Mother Wedding)
सिद्धार्थच्या आईचं लग्न ही गोष्ट जेव्हा समोर आली तेव्हा सून म्हणून मितालीला काय वाटलं, याबाबत बोलताना मिताली म्हणाली, “मला सिद्धार्थने ही गोष्ट सांगितली तेव्हा मला त्याचा खूप अभिमान वाटला.त्याने केलेल्या या विचाराचं कौतुक वाटलं. खरं सांगायचं तर मला खूप भीतीही वाटली कारण सिद्धार्थच्या आई आधीच बऱ्याच गोष्टींतून गेल्याने त्या सावध झाल्या होत्या. मग आता परत सर्व जुळवून यायला, किंवा पुन्हा हे सर्व छानचं होईल का याची थोडीशी भीती वाटली. आणि छान होणार असेल तर हे सर्व करण्यात अर्थ आहे, नाहीतर पुन्हा त्याच गोष्टी समोर येणार. एका दिवसाचं सुख तिच्या वाटेला येणार असेल तर मला तसं नको होतं आणि म्हणून मी सुरुवातीला प्रचंड घाबरले होते. मी जेव्हा काकांना पहिल्यांदा भेटले तेव्हा माझ्या मनातील भीती नाहीशी झाली.
यावर सिद्धार्थ म्हणाला, “वीस एक वर्षांनी माझ्या आईला तिचा संसार पुन्हा मिळाला आहे. आणि मी आता तिला कोणतीच गोष्ट करण्यापासून थांबवत नाही. आता यापुढे चांगलं होईल की वाईट हे कुणाच्याच हातात नाही आहे. जर का एक दिवस जरी तो आनंद माझ्या आईला मिळणार असेल तर तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा त्यांना भेटल्यानंतर ही सगळी भीती निघून गेली. आपण नाही म्हटलं तरी आपल्याला डोळे वाचायला जमतं, ती व्यक्ती कशी आहे हे त्या व्यक्तीच्या डोळ्यांमधून कळतं. त्यामुळे नितीन त्यांच्या डोळ्यातून शुद्ध असल्याचं कळलं. पुल यांचं एक वाक्य आहे की, त्याच्या डोळ्यात छप्पन सशांची व्याकुळता दाटून आली होती, या वाक्यानुसार ते आहेत. ते खूप साधे आहेत. आणि माझी आई खूप साधी नसल्याने त्यांचं जुळून आलं” असं सिद्धार्थ हसत म्हणाला.
पुढे सिद्धार्थ म्हणाला, “माझी आई काय आयुष्य जगतेय हे मला माहित आहे किंवा आम्हा दोघांना माहित आहे. तिला कशाची गरज आहे हे आम्हाला माहित आहे. तिची ती गरज आम्ही ओळखली आणि पूर्ण केली. ती गरज सोबतीची होती, रोज संवाद साधण्याची होती आणि ही माझ्या आईची गरज आम्ही पूर्ण केली. आम्ही आमचं कौतुक करण्यासारखी कोणतीच मोठी गोष्ट केलेली नाही”.