गेल्या काही दिवसांपुर्वी रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तिच्या या व्हायरल व्हिडीओवरुन सोशल मीडियासह अनेक माध्यमांवर गदारोळ झाला होता. यानंतर अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यादेखील एका फोटोबरोबर छेडछाड करण्यात आली होती. रश्मिका, कतरिना नंतर आता अभिनेत्री काजोलही या डीपफेक व्हिडीओची शिकार झाली आहे. सध्या सोशल मीडियावर काजोलचा एक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओची सर्वत्र चर्चा होत आहे. (Actress Kajol Devgan Deepfake Video Viral)
या व्हायरल व्हिडिओमध्ये काजोल कपडे बदलताना दिसत आहे. ‘काजोल देवगण कॅमेऱ्यात कपडे बदलताना कैद झाली’ असे कॅप्शन देत हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. मात्र ‘वेबसाइट बूम’ने या व्हायरल व्हीडिओमागील तथ्य समोर आणले आहे. या तथ्यावरून व्हिडीओमधील व्यक्ती काजोल नाही तर एक सोशल मीडिया इन्फ्लूएंसर असल्याची बातमी समोर येत आहे. जून महिन्यात तिने हा व्हिडिओ शेअर केला होता. या इन्फ्लूएंसरने ‘get ready with me’ या चॅलेंजसाठी कपडे बदलतानाचा हा व्हिडीओ तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केला होता. मात्र या व्हिडीओला चुकीच्या पद्धतीने एडिट करत यात काजोलचा चेहरा लावण्यात आला आहे.
रश्मिका व कतरिनाच्या डीपफेक व्हिडीओवरुन सोशल मीडियासह इतर माध्यमांवर अनेक कलाकारांनी याविरुद्ध आवाज उठवला होता. स्वत: रश्मिकाने यासंबंधित एक पोस्टदेखील शेअर केली होती. या प्रकरणात अमिताभ बच्चन यांनीदेखील रश्मिकाला पाठिंबा दिला होता. या प्रकरणानंतर अशा विकृतीला आळा घालण्यासाठी कायदेशीर कारवाईची मागणीदेखील केली गेली.
आणखी वाचा – अभिनेता महेश बाबूने वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त घेतला मोठा निर्णय, वाचून तुम्ही कराल त्याचं कौतुक
रश्मिका मंदाना प्रकरणात दिल्ली पोलिसांनी १० नोव्हेंबरला एफआयआर दाखल केली होती. त्यानंतर १५ नोव्हेंबरला आरोपीला अटक केली होती. अशातच आता काजोलच्या या व्हायरल व्हिडीओमुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. काजोलच्या या व्हिडीओमुळे तिचे चाहते नाराज झाले असून अनेक माध्यामांतून ते यावर प्रतिक्रिया देत आहेत. त्याचबरोबर असे कृत्य करणाऱ्याला शिक्षा देणाची मागणीदेखील करत आहेत.