Shashank Ketkar Answers To Netizens : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. बरेचदा सामाजिक मुद्द्यांमुळे शशांक चर्चेत असलेला पाहायला मिळाला आहे. कालच शशांकने ठाण्यात फुटपाथवर अस्थावस्था पडलेल्या कचऱ्याचा व्हिडीओ शेअर करत ठाणे महानगपालिकेला टॅग करत तक्रारीचा व्हिडीओ शेअर केला होता. याची दखल घेत महानगर पालिकेने रस्त्यावरील कचरा २४ तासाच्या आत उचलला. यानंतर शशांकने व्हिडीओ शेअर करत महानगरपालिकेचे आभारही मानले. शशांकने कचऱ्याच्या शेअर केलेल्या व्हिडीओवर काहींनी त्याचं कौतुक केलं तर काहींनी शशांकला ट्रोलही केलेलं पाहायला मिळालं.
शशांकने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्याने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “जेवढी मेहनत व्हिडीओ काढण्यात गेली, तेवढ्यात १०% सफाई सुद्धा झाली असती पण तुम्ही व्ह्यूज व प्रसिद्धीच्या शोधात. अंधाराला सगळेच घाबरतात पण स्वतःला पेटवून प्रकाश पाडण्याची जबाबदारी कमी लोक घेतात. नाव ठेवायला सोप्पं आहे जबाबदारी घ्यायला हिंमत लागते”.
नेटकऱ्याच्या या व्हिडीओवर शशांकने उत्तर देत चांगलंच सुनावलेलं पाहायला मिळत आहे. शशांकने असं म्हटलं की, “कलाकारांकडून रिप्लाय मिळवण्याच्या शोधात असणारे तुम्ही. तुम्ही जे काम करता त्याची जबाबदारी घेता? मी तरी माझ्या कामाची जबाबदारी घेतो. मग शहर, राज्य नीट स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ज्यांची आहे ते ती जबाबदारी का पार पाडत नसतील? कचऱ्याचा त्रास मला एकट्याला होत नाही. तुम्हाला, मला सगळ्यांनाच होतो मग त्या त्रुटी लक्षात आणून द्यायला नकोत?. चांगले काम केल्यावर कौतुकसुद्धा केलं आहे ते सोयीस्कर रित्या विसरलात का?”.

पुढे अभिनेता असंही म्हणाला आहे की, “राहता राहिला प्रश्न राजकारणी लोकांना उपदेश करायचा. तर ते राजकारणी लोक आमच्या क्षेत्रात कसे कसे सहभागी असतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. जर त्यांना आमच्या कामात रुची असेल तर आपल्याला त्यांच्या कामात का नसावी?. जरा विचार करा दादा. देश स्वच्छ व्हावा आणि त्यात आपला खारीचा वाटा असावा, असं मला तरी वाटतं”.