जगभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहताना पाहायला मिळत आहेत. अखेर काल या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मतमोजणी पूर्ण झाली असून विजयी उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. या निवडणुकीच्या विजयानंतर अनेक कलाकार मंडळीही आपलं मत मांडताना दिसत आहेत. या दरम्यान निवडणुकांच्या निकालानंतर आता एका मराठमोळ्या अभिनेत्याने मोजक्याच शब्दात प्रतिक्रिया देत केलेली पोस्ट लक्षवेधी ठरत आहे. हे अभिनेते म्हणजे शरद पोंक्षे. (Sharad Ponkshe Post)
आपली परखड भूमिका आणि रोखठोक वक्तव्य यामुळे एक नाव कायमच चर्चेत राहणारं नाव म्हणजे शरद पोंक्षे. अनेकदा ते त्यांच्या सोशल मीडियावरील विविध पोस्टमुळेदेखील प्रसिद्धी झोतात येत असतात. अशातच त्यांनी सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. शरद यांनी केलेली ही पोस्ट यंदाच्या निवडणुकांच्या विजयावर असून नागरिकांना खोचक टोला लगावणारी आहे.

“स्वा. सावरकरांचं वाक्य पुन्हा खरं ठरलं. मला मुस्लिमांची, ख्रिश्चनांची भिती वाटत नाही मला हिंदूंची भीती वाटते कारण हिंदूच हिंदूत्वाच्या विरोधात ऊभे ठाकतात”, अशा मोजक्या शब्दांत केलेली ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये थेट निवडणुकांचा उल्लेख केला नसला तरी ही पोस्ट राजकारणावर असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. शिवाय नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंटवर ही पोस्ट राजकारणासंबंधित असल्याचा खुलासा होत आहे.
या पोस्टवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान एका नेटकऱ्याने शरद पोंक्षे यांच्या पोस्टला पाठिंबा देत असं म्हटलं आहे की, “लोकांनी किती मोठी चूक केली हे कळेल साहेब बोलून काही फायदा नाही, चुकून ही एकत्र आलेले सर्व पक्षाचं सरकार आलं तर परत सर्व सुरु होईल जर हेच हवं असेल तर यातून यांना कोणीही वाचवू शकणार नाही. नंतर वेळ निघून गेल्यावर वाचवा वाचवा ओरडत फिरतील. देव करो मोदी सरकार परत यावं आणि या देशाला वाचवावं, आणि बीजेपीने फोडाफोडीचं राजकारण कमी करुन योग्य ते कराव त्याचा फटका जास्त बसला आहे हे कळवा”, असं म्हटलं आहे.