लवकरच आता श्रावण महिना संपायला येणार असून सगळीकडे सण वाऱ्यांच्या उत्साह पाहायला मिळतोय. दहिहंडी, गणेशोत्सवाची लगबग सर्वत्र पाहायला मिळतेय. दहीहंडीचा उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बरं, आजकाल या कार्यक्रमांमध्ये कलाकार मंडळींचा सहभाग असलेला पाहायला मिळतो. गणेशोत्सवासाठी ढोल ताशे पथक असो जिथे ही कलाकार मंडळी आनंद लुटत असतात, तर काही कलाकार दहीहंडी उत्सवादरम्यान उपस्थिती लावून उत्सवाची शोभा वाढवतात. (Santosh Juvekar On Dahihandi)
राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह व दहीहंडीचा जोरदार सराव सुरु असताना एका मराठमोळ्या अभिनेत्यानं दहीहंडी सरावात सहभागी होऊन दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. या अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर. संतोष हा दरवर्षी दहीहंडीला गोपाळ मित्रांना आवाहन करत असतो. गेल्या वर्षी त्याने “दहीहंडी हा सण सणा सारखाच साजरा करा त्याची स्पर्धा करू नका”, असं आवाहन जनतेला केलं होतं. यावर्षी संतोषने दहीहंडी फोडण्याची इच्छा पूर्ण करून पुन्हा गोपाळ मित्रांना विनंती करत आवाहन केलं आहे.
याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर करत त्याने लिहिलं आहे की, “अनेक वर्ष झाली दही हंडी खेळून आणि हे अस थर रचून हंडी फोडण याची मजा काही औरच. खूप मिस करतो ही मजा यार. आता celebrity सारखं जाऊन स्टेजवर उभ राहून हंडी बघणं आणि सगळ्यांना फोटो देत भेटत हात दाखवत गप गाडीत बसून कल्टी. पण काल माझ्या मित्रांनी नितीन चव्हाण व अजय सुपेकरने माझी इच्छा पूर्ण केली”.
“काल शिवशाही क्रीडा मंडळ, नेरुळ (वाशी), सेक्टर १० मधे टिपिकल चाळकरी माहोलमध्ये दहीहंडीच्या सरावात तिकडच्या माझ्या सारख्याच माझ्या चाळीतल्या मित्रांबरोबर थर रचून हंडी फोडायला मिळाली. खूप खुश झालो”. असं म्हणत त्याने सहकाऱ्यांचे आभार मानले. ‘तसेच मज्जा करा आणि स्वतःची काळजी पण घ्या खास करून हंडी फोडायला वर चढणाऱ्या लहान मुलांची काळजी घ्या’, असं आवाहन त्याने केलं आहे.