Sanket Korlekar Video : मराठी मालिकाविश्वातील अभिनेत्याबाबत खूप मोठी अपडेट समोर आली आहे. ‘अजूनही बरसात आहे’, ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता संकेत कोर्लेकरबाबत अपडेट आली आहे. अभिनेत्याचा मोबाईल चोरीला गेली असल्याचं समोर आलं आहे. रविवारी १६ मार्च २०२५ ही घटना घडली आहे. याबाबत स्वतः अभिनेत्यानेच पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. गेल्या महिन्यात संकेतने १ लाख ७० हजारांचा महागडा फोन विकत घेतला होता. फोन चोरीला गेल्यानंतर त्याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ही संपूर्ण घटना त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत दिली आहे.
संकेतने हा व्हिडीओ शेअर करत मोबाईल चोरीला गेला असल्याचं सांगितलं. व्हिडीओ शेअर करत त्याने घटनाक्रम सांगत असं म्हटलं की, “नमस्कार, मी संकेत कोर्लेकर. मागच्या महिन्यात मी iPhone 16 Pro Max हा १ लाख ७० हजारांचा फोन विकत घेतला होता. काल म्हणजेच १६ मार्चला, मी ठाण्यात एका मीटिंगसाठी जात होतो. तिथे विवियानाच्या विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर माझ्या हातातून दोन बाईकस्वारांनी मोबाईल हिसकावून चोरला”.
आणखी वाचा – कधीच स्त्री पात्र साकारणार नसल्याची सागर कारंडेची घोषणा, पण नक्की झालं काय?, म्हणाला, “यापुढे मी…”
पुढे अभिनेता म्हणाला, “मी काळजीपोटी मोबाईलला स्ट्रॅप लावतो आणि तो माझ्या हातात घालतो. तुम्ही बघू शकता अजूनही रॅशेस गेलेले नाहीत. इतक्या जोरात प्रेशरने माझ्या हातातून मोबाईल हिसकावून ते घेऊन गेले. मी पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. माझा पोलिसांवर विश्वास आहे की ते कारवाई करुन मला माझा फोन मिळवून देतील. पण, अलर्ट व्हायचा मुद्दा हाच आहे की मी रिक्षात होतो. मी मध्ये बसलेलो असताना सुद्धा त्यांनी वाकून माझा फोन माझ्या हातातून हिसकावून घेतला.
आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ला अधिकाधिक पुरस्कार न मिळण्यावरुन प्रेक्षकांची नाराजी, मालिका अव्वल स्थानावर तरीही…
पुढे त्याने सतर्क राहण्याचा सल्ला देत म्हटलं की, “आज मी आहे. उद्या एखादी महिला असेल. मोबाईल तर सोडाच ते १० हजारांच्या मोबाईलसाठी आसुसलेली लोकं आहेत. हे ठाण्यात घडेल असा मी अजिबातच विचार केलेला नव्हता. पण, हे घडलंय इतका चोरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे तुम्ही अलर्ट राहा. मी पोलिसांनीही विनंती करतो की जितकी सुरक्षा पुरवता येईल, तेवढी द्या. मी हे सांगण्याचा मुद्दा हाच आहे की, माझ्यानंतर ५ मिनिटांनी आणखी एक जण विवियाना मॉलसमोरुन मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार नोंदवण्यासाठी आला होता. त्यामुळे ही काळजीची बाब आहे”.