अभिनेता संकर्षण कऱ्हाडे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या संकर्षण रंगभूमी गाजवताना दिसत आहे. नाटकांच्या दौऱ्यानिमित्त तो अनेकदा फिरताना ही दिसतो आणि याबाबतचे अपडेट तो सोशल मीडियावरुन शेअरही करतो. अशातच संकर्षण त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील एका पोस्टमुळे चर्चेत आला आहे. संकर्षणने शाळेतील शिक्षिकेकडून बक्षीस मिळाल्याची पोस्ट शेअर केली होती, त्यावर नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्स चर्चेत आल्या आहेत. तर यावर नेटकऱ्यांना संकर्षननेही उत्तर दिलेलं पाहायला मिळत आहे. (Sankarshan Karhade Answers to Trollers)
संकर्षणने ही पोस्ट शेअर करत, “माझ्या शाळेच्या मराठीच्या बाईंनी मला बक्षीस दिलं. माझ्या परभणीतल्या शाळेत मला मराठी शिकवायला याच जपेबाई होत्या. नेहमी मला वर्गात उठवायच्या आणि कऱ्हाडे, धडा वाच, कऱ्हाडे अक्षर अतिशय घाण आहे, तुझं ऱ्हस्व-दीर्घ कधी सुधारणार? असं म्हणायच्या. पोरांना शिकायचा कंटाळा आला की त्या, “कऱ्हाडे गाणं म्हण” असं म्हणायच्या. आज त्याच माझ्या मराठीच्या बाई कवितांच्या कार्यक्रमाला अमेरिकेत आल्या आणि त्यांनाी मला कवितांसांठी बक्षीस दिलं. मला खूप भरुन आलं. प्रेक्षकांना भेटतांना तसा मी शांत उभा असतो पण बाई भेटायला आल्या आणि मला खरंच भीती वाटली. माझी आज शब्दांशी जर मैत्री असेल तर ती बाईंनीच करुन दिली आहे”, असं म्हटलं आहे.
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “हे नातं तेव्हाचं आहे जेव्हा शाळेतल्या बाईंना बाईच म्हणायचो. समजा, शाळेतले गुरुजी भाजी मंडईत जरी दिसले तरी भीती वाटायची आणि घाबरुन चालत्या सायकलवरुन उडी मारायचो. अभ्यासात मी कधीच हुशार नव्हतो आणि त्यामुळे तेव्हा बक्षीस मिळवून घरी पळत जाऊन आई-बाबांना ते आनंदानं सांगण्याचं सुख कधी मिळालं नाही पण आज सांगतो आई-बाबांना, बायको आणि माझ्या छोट्या मुलांनाही माझ्या बाईंनी मला बक्षीस दिलं”.
संकर्षणची ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी व्याकरणाच्या चुका काढल्या आहेत. संकर्षणच्या व्याकरणातील चुका काढत नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच ट्रोल केलं आहे. “व्वा कऱ्हाडे सुंदरच पण हे कॅप्शन बाईंनी वाचल्यावर रागावणार बघा किती ती ऱ्हस्व दीर्घची गडबड”, असं गमतीत म्हटलं आहे. नेटकऱ्याच्या या कमेंटवर संकर्षणने मिश्किल अंदाजातचं उत्तर देत, “ते काही सुधरत नाही बघा”, असं म्हटलं तर आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने कमेंट करत, “जपे बाईंनी ही पोस्ट वाचू नये याची काळजी घ्या. ऱ्हस्वदीर्घाच्या चिक्कार चुका आहेत”, असं म्हटलं आहे. यावर उत्तर देत अभिनेता असं म्हणाला आहे की, ” बक्षीस पोस्टसाठी नाही , कार्यक्रमासाठी मिळालं आहे”, असं म्हटलं आहे.