अभिनय क्षेत्रात असे काही कलाकार आहेत जे त्यांच्या अभिनयाव्यतिरिक्त त्यांच्यातील बऱ्याच कलागुणांमुळे ओळखले जातात. संकर्षण एक उत्तम अभिनेता तर आहेच, याशिवाय तो उत्तम कवी, निवेदक, लेखक, दिग्दर्शकही आहे. संकर्षणच्या कविता ऐकणं ही साऱ्या रसिकांसाठी पर्वणीच असते. नाटक, मालिका, चित्रपट या तीनही क्षेत्रात काम करुन तो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. सध्या संकर्षण नाटकविश्वामध्ये अधिक रमलेला पाहायला मिळत आहे. (Sankarshan Karhade Fan Moment)
सिनेक्षेत्रात मुशाफिरी करत असलेला संकर्षण सोशल मीडियावरदेखील कायमच ऍक्टिव्ह असतो. तो नेहमीच त्याच्या कामासंदर्भातील तसेच सामाजिक घडामोडींवर आधारीत पोस्टही सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतो. याशिवाय तो अनेकदा त्यांच्या चाहत्यांचे किस्सेदेखील शेअर करताना दिसतो. अशातच अभिनेत्याने शेअर केलेल्या इन्स्टाग्रामवरील एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका फॅन मुमेंटवरुन संकर्षणने ही पोस्ट शेअर केली आहे.
संकर्षणने ८४ वर्षांच्या आजीचा संकर्षणची मुलाखत बघतानाचा एक फोटो पोस्ट केला आहे. याखाली कॅप्शन देत त्याने, “मी मध्यंतरी ‘व्हायफळ’ नावाच्या युट्युब चॅनेलसाठी सुयोग, प्राची यांच्याबरोबर जाऊन गप्पा मारल्या. खरं सांगू, वेगवेगळ्या देशांतल्या मराठी लोकांनी मला मुलाखत आवडल्याचे मेसेज, फोन करत सांगितलं, पण काल हा फोटो आला. इन्स्टाग्रामवर कोणीतरी मला मेसेज करुन सांगीतलं की, माझ्या ८४ वर्षांच्या आजीने तुझी २ तासांची मुलाखत मन लावून सलग पाहिली आणि तीला खूप आवडली. ती म्हणाली हे त्याला सांग माझ्या डोळ्यांत पाणी आलं हो” असं त्याने म्हटलं.
यापुढे त्याने लिहिलं होत की, “किती गोड फोटो आहे हा. मी या मुलाखतीसाठी सुयोग, प्राचीचे, मला मेसेज केलेल्या व न केलेल्या अशा सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो. माझ्यावर, माझ्या कामावर प्रेम करत रहा, मी निराश करणार नाही” असंही तो म्हणाला.