भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झापासून विभक्त झाल्याच्या अफवांदरम्यान पाकिस्तानचा क्रिकेट स्टार शोएब मलिकने प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदबरोबर लग्न केले आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिकने दुसरे लग्न केले आहे. हे लग्न अशावेळी झाले आहे जेव्हा सानिया मिर्झापासून वेगळे झाल्याची बातमी समोर आली आहे. शोएब मलिकने स्वतः याबाबतची माहिती त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन चाहत्यांसह शेअर केली आहे. आज शोएबने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे म्हणजेच निकाहचे अनेक फोटो शेअर केले आहेत. (Shoaib Malik Wedding)
विशेष म्हणजे, बुधवारी सानिया मिर्झाने एक गुप्त पोस्ट शेअर केली होती ज्याने तिच्या व शोएब मलिकमधील घटस्फोटाच्या अफवा आणखी तीव्र होत गेल्या. सानियाने ही पोस्ट शेअर करत लिहिले होते की, “लग्न कठीण आहे, घटस्फोट घेणे कठीण आहे. पण हे कठोर पर्याय योग्यवेळी निवडा. लठ्ठपणा कठीण बाब आहे. तंदुरुस्त राहणे कठीण आहे. तुमचे सर्वात कठीण पर्याय निवडा. कर्जात अडकणे कठीण आहे. आर्थिकदृष्ट्या शिस्तबद्ध राहणे कठीण आहे. तुमचे सर्वात कठीण पर्याय निवडा. संवाद अवघड आहे, बोलणे कठीण आहे. तुमचे सर्वात कठीण पर्याय निवडा. जीवन कधीही सोपे होणार नाही. ते नेहमीच कठीण असेल. पण आपण आपली मेहनत निवडू शकतो”.
शोएबने लग्न केलेल्या सना जावेदचाही घटस्फोट झाला आहे. पाकिस्तानातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असलेल्या सना जावेदने २०२० मध्ये उमेर जसवालशी लग्न केले. या जोडप्यामध्ये सर्व काही ठीक चालत नसल्याचे समोर आले. कालांतराने दोघांनीही आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एकमेकांचे फोटो डिलीट केलेले पाहायला मिळाले
शोएबने लग्न केलेली २८ वर्षीय सना जावेद ही पाकिस्तानच्या अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे, तिच्या नावे ‘ए मुश्त-ए-खाक’, ‘डंक’ यांसारखे अनेक प्रसिद्ध शो आहेत. याशिवाय ती अनेक गाण्यांमध्येही झळकली आहे.