sankarshan karhade on condition of theaters : मराठी मनोरंजनविश्वाचा पाया म्हणजे रंगभूमी. आजवर रंगभूमीने मराठी सिनेविश्वाला अनेक कलाकार दिले. सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात आजकाल प्रेक्षकवर्ग नाटकांकडे वळला आहे. नाटकांना प्रेक्षकांचं प्राधान्य मिळत असताना नाटकांच्या दुरावस्थेबाबतचे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बरीचशी नाट्यगृह सुधारली आहेत मात्र काही नाट्यगृहांकडे लक्षही दिलं जात नाही आहे. आणि हो, नाट्यगृहाच्या या वाईट स्थितीबाबत अनेक कलाकारांनीही स्पष्ट भाष्य करत आपलं मत मांडलं आहे. अशातच आता मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नाटकांच्या दुरावस्थेबाबत भाष्य केलं आहे.
मराठी नाटक, चित्रपट, मालिका यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत संकर्षणने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सध्या संकर्षण नाटकांमध्ये अधिक रमला आहे. कुटुंब किर्रतन हे त्याचं नाटक रंगभूमी गाजवताना दिसत आहे. नाटकांबाबतचे अपडेट तो नेहमीच सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसह शेअर करताना दिसतो. संकर्षण हा मूळचा परभणीचा आहे. आणि परभणीवर त्याचं विशेष प्रेम आहे हे त्याच्या पोस्टमधून आपण पाहिलंच आहे. ‘कुटूंब किर्रतन’ नाटकाचा मराठवाडा दौऱ्यात परभणीला प्रयोग नाही यावरुन त्याने थेट पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.
आणखी वाचा – “माझ्याकडे येऊन खूप रडला पण…”, तुषार घाडीगांवकरच्या जवळच्या मित्राने सांगितलं मृत्यूमागील खरं कारण, म्हणाला…
संकर्षणने पोस्ट शेअर करत म्हटलं की, “परभणीत फक्त पाय ठेवता आले. आजपासून ‘कुटूंब किर्रतन’ नाटकाचा मराठवाडा दौरा आहे. आज २३ जून नांदेड, उद्या २४ जून लातूर , २५ जून छ. संभाजीनगर असे प्रयोग आहेत. दुर्दैवाने या यादीत ‘माझं गाव… परभणी नाही…’. याचं कारण, परभणीतल्या रंगमंदिराची दूरावस्था. इतकं वाईट वाटलं की ज्या परभणीत कलाकृतींची, कलाकारांची परंपरा आहे तिथे तिथल्याच कलाकाराच्या व्यावसायिक नाटकाचा प्रयोग होऊ शकत नाही. असो. आपलं गांव ते आपलं गांव. प्रेम तितकंच आहे. कधीतरी इथेही प्रयोग होईल अशी आशा. माझ्या माणसांनो, प्रेक्षकांनो नाटकाला या”.
संकर्षणच्या या पोस्टवर त्याच्या परभणीच्या एका चाहत्याने कमेंट करत असं म्हटलं की, “अगदी बरोबर संक्या भाऊ, नटराज रंग मंदीराची तर अगदी कचरा कुंडी झाली. राहिलं बी. रघुनाथ सभागृह त्याची ही अवस्था जैसे थे. एक परभणीकर म्हणून तुझ्या सारख्या हुरहुन्नरी परभणीकर कलाकाराला रंगभुमीवर बघण्याची इच्छा एव्हाना तरी अधुरीच. आशा आहे की, लवकरच संक्या भाऊ तुम्हांस परभणीच्या रंगभुमीवर पाहायची संधी मिळेल”. तर आणखी एकाने कमेंट करत, “सगळ्याच गोष्टीत खूप मागे आहे राव परभणी”, असं म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. “पिकते तिथे किंमत नसते संकर्षण दादा”, “खरंच परभणीतील कलाकारांसाठी तरी भव्य नाट्य मंदीर असावेत. तुमची सर्व नाटके आवर्जून पाहण्यासारखी आहेत. तुझा अभिमान आहे दादा”, अशा कमेंट संकर्षणच्या पोस्टवर केल्या आहेत.





