मराठी सिनेसृष्टीतील सर्वगुण संपन्न अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. तो फक्त एक उत्तम अभिनेताच नाही तर तो एक उत्तम लेखक, दिग्दर्शक व कवीसुद्धा आहे. तो वेगवेगळ्या कलाकृतींसह नेहमी प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. सध्या तो त्याच्या ‘नियम व अटी लागू’ नाटकांच्या दौऱ्यांमध्ये व्यग्र असलेला पाहायला मिळत आहे. अमेरिकेत त्याच्या या नाटकाचे प्रयोग सुरु होते. त्याचबाबत नुकतीच त्याने एक पोस्ट शेअर करत या दौऱ्याबद्दलचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. अमेरिकेतील नाटकाच्या दौऱ्यादरम्यानचे अनुभव शेअर करताना त्याने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात त्याच्या एका हातात भारताचा तर दुसऱ्या हातात अमेरिकेचा झेंडा दिसत आहे. त्याने हा फोटो पोस्ट करत अमेरिकेत त्याला मिळालेलं प्रेम, तेथील प्रयोगादरम्यानचे अनुभव व आठवणींचा साठा या सगळ्याचा मेळ शब्दात मांडला आहे. (Sankarshan karhade share a post America tour)
या पोस्टमध्ये संकर्षण लिहीतो, ‘’नियम व अटी लागू’ नाटकाचा आज अमेरिकेतला १३ प्रयोगांचा दौरा संपूर्ण झाला.. आजच्या टॅम्पा येथील प्रयोगाला सुद्धा जोरदार प्रतिसाद मिळाला. एकुण ३६ दिवस , २१ विमान प्रवास , हजारो मैलांचं अंतर , १३ शहरं , नाटकाच्या सगळ्या प्रयोगांना मिळुन आलेले , भेटलेले , जवळपास ५००० मराठी रसिक प्रेक्षक आणि मिळालेलं अगणित प्रेम. अमेरिकेच्या या दौऱ्यात खूप प्रेम मिळालं. नाटक सगळ्या प्रेक्षकांना खूप आवडलं. प्रयोगाच्या निमित्ताने १३ वेगवेगळ्या शहरांतल्या मराठी कुटुंबांच्या घरी राहाता आलं. त्यांनी खूप प्रेम दिलं. काही ठिकाणी माझ्या घरच्या सारखा गणेसोत्सव होता. तर काही घरांतल्या हातची चव अगदी माझ्या आईच्या हातची होती. काही ठिकाणी औक्षण करुन स्वागत झालं तर, काही ठिकाणी निरोप द्यायला सगळं कुटुंब दारात ऊभं बघून मलाही रडू आलं. कामासाठी, नोकरीसाठी, कुटुंबासाठी आपल्या “भारतापासून” सातासमुद्रापार असलेली ही सगळी मराठी माणसं , कुटुंब त्यांच्यातली रसिकता पूरेपूर टिकवून आहेत. हे सगळं समृद्ध करणारं आहे’
संकर्षण पुढे लिहीतो, ‘या सगळ्यासाठी THANK YOU अमेरिका???????? आणि आता उद्या सुरू होणार परतीचा प्रवास आपल्या भारताकडे…???????? फार फार आठवण येते आहे. आता कान आतूर झाले आहेत ऐकायला की, “कुछ ही समय बाद हमारा विमान मुंबई के छ. शिवाजी महाराज आंतरराष्ट्रिय हवाई अड्डे पर उतरेगा ???????? ११ ऑक्टोबरला पहाटे पोचतो आणि मग भेटूच’, असं लिहित त्याने महाराष्ट्रातील पुढिल प्रयोगांबद्दलही माहिती दिली.
शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांनीही लाईक व कमेंटचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने, ‘खूप छान शब्दात मांडला आहे अनुभव! पुढिल सर्व प्रयोगांसाठी शुभेच्छा!’, अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने, ‘तुम्ही अप्रतिम आहात. तुमची नाटकं अजून पाहायची आहे. कोथरुडला लवकरच भेटू’, असं म्हटलं आहे. अमेरिकेतील दौऱ्यानंतर संकर्षण आता पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर ‘नियम व अटी लागू’ नाटक घेऊन येत आहे. त्याचे पुढिल प्रयोग हे ठाणे, चिंचवड, बोरिवली, विलेपारले याठिकाणी असतील.