‘टाईमपास’ चित्रपटातील दगडू ही भूमिका प्रेक्षकांना आजही चांगलीच लक्षात आहे. हे पात्र साकारणारा अभिनेता प्रथमेश परब या भूमिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचला. त्याने त्यानंतर बऱ्याच विनोदी चित्रपटांमध्ये काम केलं. प्रथमेश त्यांच्या अभिनयाबरोबर त्याच्या खासगी आयुष्यामुळे बराच चर्चेत असतो. काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याने प्रेमाची कबुली दिली होती. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या गर्लफ्रेंडने व्हिडीओ शेअर करत भलं मोठं कॅप्शन लिहीत त्याला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. (prathamesh parab birthday post from girlfriend)
प्रथमेशच्या गर्लफ्रेंडने म्हणजे क्षितिजा घोसाळकरने प्रथमेशचा वाढदिवस जोरदार साजरा केला. त्यातील काही खास क्षणांचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यात क्षितिजा कॅमेऱ्यात लूक देताना दिसते त्यानंतर ती कॅमेरा प्रथमेशकडे वळवते. त्यानंतर प्रथमेश कॅमेऱ्यात बघून डोळे मोठे करून दाखवतो. असा या दोघांचा मजेशीर अंदाज व्हिडीओत पाहायला मिळाला. तिने खास प्रथमेशसाठी चॉकलेट केकही आणला होता. वाढदिवसाचे काही छान फोटोही व्हिडीओत दिसले. वाढदिवस साध्या पण रोमँटिक अंदाजात सेलिब्रेट करत तिने त्याच्या या खास दिवसाला आणखीन खास बनवलं.
या व्हिडीओला कॅप्शन देत ती लिहीते, “प्रथमेश, तू किती छान व्यक्ती आहे. हे तुला सांगण्यासाठी बरीच वर्ष निघून जात आहेत. तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं सगळं आयुष्य अगदी प्रकाशमय झालं आहे. मी खूप मोठी भाग्यवान आहे की तुझ्यासारखी विचारी, काळजी घेणारी खूप गोड व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे.तू खरंच खूप अविश्वसनीय आहे. तू नेहमी मला प्रेरणा देत आला आहेस. तु माझा आहेस म्हणून मी समाधानी आहे. आपण बांधलेल्या या अतुट नात्याच्या बंधाशिवाय मी तुझ्याकडे दुसरं काहीच मागत नाही”.
ती पुढे लिहीते, “माझ्यासाठी संपूर्ण जग असलेल्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू माझ्या आयुष्यात असणं हे माझ्यासाठी भाग्याचं आहे. तू माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहेस हे तुला कळावं हीच इच्छा आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे”, असं लिहीत तिने प्रथमेशसाठी गोड व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओवर प्रथमेशने रोमँटिक अंदाजात कमेंट केली आहे. ‘खूप खूप धन्यवाद माय लव्ह’, असं लिहीत त्याने कमेंट केली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी तसेच त्याच्या चाहत्यांनी लाईक, कमेंटचा वर्षाव करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.