‘झिम्मा २’ या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घातला आहे. कोटींची कमाई करत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवत आहे. या चित्रपटाच्या टिझर, ट्रेलर व गाण्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. त्यानंतर चित्रपट प्रदर्शित होऊन प्रेक्षकांच्या उत्सुकतेला पूर्णविराम मिळाला. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांबाहेर रांग लावताना दिसत आहेत.‘झिम्मा २’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरु असलेली पाहायला मिळत आहे. (Nirrmite Saawaant On Jhimma 2)
प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळणाऱ्या या चित्रपटात सात बायकांची मैत्री अधिकच घनिष्ट पाहायला मिळाली. सात मैत्रिणी व त्याच्या सात तऱ्हा चित्रपटात पाहायला मिळत आहे. प्रत्येकीची प्रेम व्यक्त करण्याची भाषा वेगळी असलेली चित्रपटात पाहायला मिळत आहे. या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सिद्धार्थ चांदेकर यांच्या भूमिका पाहायला मिळत आहेत. या चित्रपटात कलाकारांची धमाल मस्ती प्रेक्षकांना विशेष भावली.
चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही कलाकार मंडळी विशेष मेहनत घेताना दिसत आहेत. सगळेच कलाकार चित्रपटगृहांमध्ये जाऊन प्रेक्षकांना भेटून त्यांच्या आनंदात भर घालताना दिसत आहेत. अशातच एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. निर्मिती सावंत यांची चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. निर्मिती सावंत चित्रपटात निर्मला कोंडे पाटील ही भूमिका साकारत आहेत. चित्रपटातील निर्मिती यांच्या संवादाने सोशल मीडिया अक्षरशः गाजवला आहे. तर त्यांची चित्रपटातील भूमिका विशेष भाव खाऊन गेली आहे.
निर्मिती सावंत यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्या एका चित्रपटगृहात जाऊन प्रेक्षकांसह झिम्मा या गाण्यावर धमाल करताना दिसत आहेत. त्यांचा हा प्रेक्षकांसह थिरकतानाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. निर्मिती सावंत यांची चित्रपटातील धमालही पाहणं रंजक ठरतंय.