मराठी नाटक, मालिका व चित्रपटांत अशा तिन्ही क्षेत्रात काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते म्हणजे प्रशांत दामले. मराठी नाटकांतील त्यांनी केलेल्या अनेक विक्रमांमुळे प्रशांत दामले यांना ‘नाटकाचे विक्रमादित्य’ म्हणूनही ओळखले जाते. मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार काहीना काही कारणांनी चर्चेत राहत असतात. कधीकधी कलाकार हे त्यांच्या कामाव्यतिरिक्त इतर अनेक कारणांमुळे चर्चेत राहत असतात. पण प्रशांत दामले यांच्यासारखी व्यक्ती ही फक्त नी फक्त त्यांच्या कामासाठीच ओळखली जाते. प्रशांत दामले यांची मराठी मनोरंजन सृष्टीतील कारकीर्द ही प्रदीर्घ आहे. गेले ४० वर्ष ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. पण या काळात त्यांच्याबद्दल कोणतेच वादविवाद समोर आलेले नाहीत आणि यावरून त्यांना एक हटके प्रश्न विचारण्यात आला.
प्रशांत दामले यांनी नुकतीच ‘सोलसम विथ सारिका’ नावाच्या एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी दामलेंना “४० वर्षांची तुमची प्रदीर्घ कारकीर्द आहे. या क्षेत्रातील मंडळींमध्ये वादविवाद, भांडणं किंवा अगदी अफेअर्स अशा गोष्टी होतात. त्या लोकांकडून खूप बारकाईने पहिल्या किंवा चर्चिल्या जातात. पण प्रशांत दामलेंच्या बाबतीत गेल्या ४० वर्षात कोणताही वादविवाद झालेली नाही, याचे कारण काय? असा प्रश्न विचारण्यात आला.
यावर प्रशांत दामले गंमतीने “याचा अर्थ तुम्हाला काही कळत नाही” असं म्हणताच उपस्थितांमध्ये व प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. पुढे दामले असं म्हणाले की, “मी जे जे काही करतो ते जगात जावं असं मला कधीच वाटत नाही. माझं काम जगात जायला पाहिजे. गंमत बाजूला ठेवूया. पण मी या इंडस्ट्रीत आल्यापासून इतकं काम करत आहे की कोणत्याही गोष्टीसाठी, अगदी अफेअरसाठीसुद्धा वेळ द्यावा लागतो. असं एका लग्नानंतर माझ्या लक्षात आलं आहे. तो वेळ जर दिला नाही तर खूप फटके पडतात. त्यामुळे मी जर वेळ देऊ शकत नसेल तर मी अफेअर कसं करणार? आणि अफेअर केलं तरी ते टिकणार कसं?. कारण मला माझं नाटक टिकवायचं आहे. कारण त्यातच माझा आनंद आहे”.
यापुढे भांडणाविषयी दामले असं म्हणाले की, “माझं कुणाशी भांडणही नाही. कारण मला जेव्हा संशय येतो, की या व्यक्तीबरोबर आपलं जमत नाही आहे. तेव्हा मी त्याच्यापासून भांडण व्हायच्या आधीच बाजूला होतो. कारण ही इंडस्ट्री खूप छोटी आहे आणि कधीतरी मला त्याच्याबरोबर काम करावं लागेल याची मला खात्री आहे.”