१९ जानेवारी शिवजयंतीनिमित्त सर्वत्र जल्लोषाचे वातावरण होते. महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवजयंतीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. शिवजयंतीनिमित्त राज्यभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याचनिमित्ताने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिलादेखील एका कार्यक्रमासाठी बोलवण्यात आले होते. लातूरमधील एका कार्यक्रमात अभिनेत्री प्रार्थना बेहेरे दाखल झाली होती. त्यावेळी तिने छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला. त्यामुळे अनेक शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत.
लातूरच्या उद्गीर मधील एका मॉलच्या उद्घाटनासाठी प्रार्थना बेहेरे दाखल झाली होती. त्यावेळी उद्घाटनादरम्यान शुभेच्छा देताना सलग चार-पाच वेळा प्रार्थनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी शब्दांत उल्लेख केला. त्यामुळे लातूरमधील शिवभक्तांकडून तिचा निषेध करण्यात येत आहे. अभिनेत्रीच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनरदेखील फाडण्यात आले आहेत. तसेच प्रार्थनाने आता माफी मागावी, अशी मागणी शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे.
प्रार्थना बेहेरे शिवजयंती निमित्तानं उद्गीर येथे एका मॉलच्या उद्घाटनाला गेली होती. तिथे बोलताना ती असं म्हणाली की, “तुम्हा सर्वांना आज शिवाजी जयंती असल्यानं खूप शुभेच्छा. जय भवानी, जय शिवाजी. उद्गीरकरांना एवढंच म्हणेन की, यानिमित्तानं मला उद्गीरमध्ये येता आलं. शिवाजी जयंतीच्या निमित्तानं मी इथे आले तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही शिवाजी जयंती कशी साजरी करता हे कळलं. इतकी छान रॅली चालली होती. सगळीकडे भगवा फडकत होता. हे सगळं पाहून खूप बरं वाटलं आणि अभिमान वाटला. मला इथे बोलावल्याबद्दल सगळ्यांचे आभार”.
आणखी वाचा – “अफेअर केलं तरी…”, अफेअरवरुन प्रश्न विचारताच प्रशांत दामलेंनी दिले स्पष्ट उत्तर, म्हणाले, “एका लग्नानंतर…”
या व्हिडीओनंतर प्रार्थना बेहेरे चांगलीच ट्रोल झाली. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. तसेच अनेक संतप्त शिवप्रेमींनी उद्गीर शहरामध्ये अभिनेत्रीचे लागलेले बॅनर फाडत संताप व्यक्त केला. दरम्यान, अभिनेत्रीबदल सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. कुणी तिच्याबद्दल नकारात्मक कमेंट्स करत तिला ट्रोल केलं. तर काहींनी “तिने मुदाम काही केले नाही, तिच्याकडून चुकून झाले असावे, तिच्या मनात शिवाजी महाराजांविषयी आदर आहे, पण बोलण्याच्या ओघात तिच्याकडून शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला गेला असावा” असं म्हणत तिला पाठिंबा दिला आहे.