राज्यभरात काल १९ जानेवारी शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. शिवजयंतीनिमित्त काल राज्यभरात सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याचनिमित्ताने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिलादेखील एका कार्यक्रमासाठी बोलवण्यात आले होते. लातूरमधील एका कार्यक्रमात अभिनेत्री प्रार्थना बेहेरे दाखल झाली होती. त्यावेळी तिने छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला. त्यामुळे अनेक शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत.
उद्गीरमधील एका मॉलच्या उद्घाटनावेळी प्रार्थनाने असं म्हटलं की, “तुम्हा सर्वांना आज शिवाजी जयंती असल्यानं खूप शुभेच्छा. जय भवानी, जय शिवाजी. उद्गीरकरांना एवढंच म्हणेन की, यानिमित्तानं मला उद्गीरमध्ये येता आलं. शिवाजी जयंतीच्या निमित्तानं मी इथे आले तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही शिवाजी जयंती कशी साजरी करता हे कळलं. इतकी छान रॅली चालली होती. सगळीकडे भगवा फडकत होता. हे सगळं पाहून खूप बरं वाटलं आणि अभिमान वाटला. मला इथे बोलावल्याबद्दल सगळ्यांचे आभार”.
लातूरमधील या उद्घाटनादरम्यान शुभेच्छा देताना सलग चार-पाच वेळा प्रार्थनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी शब्दांत उल्लेख केला. त्यामुळे लातूरमधील शिवभक्तांकडून तिचा निषेध व्यक्त केला गेला. यावेळी अभिनेत्रीच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनरदेखील फाडण्यात आले. तसेच सोशल मीडियावर अभिनेत्रीला अनेक नकारात्मक प्रतिक्रियांना सामोरे जावे लागले. यावर आता अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर करत जाहीर माफी मागितली आहे.
आणखी वाचा – लातूरमध्ये प्रार्थना बेहेरेकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, लोक भडकले, म्हणाली, “शिवाजी…”
‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी संवाद साधताना प्रार्थनाने माफी मागत असं म्हटलं की, “आज मी उद्गीर येथे मॉलच्या उद्घाटनाला आले होते. तिथे आल्यावर माझ्याकडून चुकून काही बोलण्यात आले असेल तर, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची माफी मागू इच्छिते. कृपा करून मला माफ करा, माझा त्या बोलण्याचा उद्देश चुकीचा नव्हता. मी परत म्हणते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की जय”.