एखादा कलाकार जेव्हा पेटून उठतो तेव्हा तो त्याला हवे असलेलं सर्व काही साध्य करु शकतो. एखादा अपमान आणि जवळच्या माणसाचं बोलणं माणूस जिव्हारी लावून घेतो. त्यामुळे तो आयुष्यात जे हवं ते सगळं मिळवण्याचा प्रयत्न करतो. असंच काहीसं झालं होतं मराठी अभिनेता प्रसाद ओकबद्दल. एका चॅनेलवरील पुरस्कार सोहळ्यात प्रसादच्या पत्नीला जायची इच्छा होती. पण अभिनेत्याला काही कारणामुळे जाता आलं नाही. यावर त्याच्या पत्नीने त्याला हिंमत दिली आणि त्यामुळे प्रसाद ओकने प्रामाणिक काम करत त्याच चॅनेलवरील एका पुरस्कार सोहळ्यात पहिल्या सोफ्यावरचे स्थान मिळवले. याबद्दल त्याने सौमित्र पोटेच्या ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनेलवर संवाद साधला आहे. (Prasad Oak On Award Show)
याबद्दल प्रसाद ओकने असं म्हटलं की, “२००४ च्या आसपास मालिकांचे पर्व नुकतंच सुरु झालं होतं. मी ‘आकाश पेलताना’ नावाची मालिका करत होतो. तेव्हा नुकतंच अल्फा गौरव सुरु झालं होतं आणि त्या चॅनेलवरील मालिकेत मी हीरोच्या तिसऱ्या भावाची वगैरे भूमिका करत होतो. तेव्हा वर्तनमानपत्र फार वाचले जायचे. त्यामुळे त्यात पुरस्कार सोहळ्याच्या बातम्या यायच्या. तेव्हा मंजिरीने मला “तू याच चॅनेलची मालिका करत आहेस तर आपल्याला या पुरस्कार सोहळ्यात जाता येईल का?” असं विचारलं. तर मी म्हटलं “विचारतो” आणि मग निर्मात्यांना विचारलं. त्यावर ते हसत “शक्य नाही, मला आणि प्रमुख कलाकारांनाच तिथे फक्त परवानगी आहे” असं म्हणाले. त्यांच्या हसण्यात असं होतं की, अरे बाळा अजून तू खूप लांब आहेस. तर मी ते घरी येऊन मंजिरीला सांगितलं”.
यापुढे त्याने सांगितलं की, “मी घरी येऊन मंजिरीला म्हटलं की, “मला त्यांच्या हसण्यात तू खूप छोटा आहेस, तू कोण आहेस आणि काय मागत आहेस असं सगळं सामावलेलं होतं. ते हसणं खूप लागलं”. यावर मंजिरी मला म्हणाली “ठीक आहे प्रसाद वाट बघू. हा गौरव सोहळा तर थांबणार नाही. पण इतकं काम कर की एक दिवस असा येईल जिथे पहिल्या सोफ्यावर आपल्याला बसवतील”. तिचं हे वागणंही माझ्या जिव्हारी लागलं आणि मी इतकं प्रमाणिक काम केलं की, त्याच चॅनेलचा मी ब्रॅंड अँबेसिडर झालो आणि त्यांनी मला ‘अजिंक्यतारा’ ही पदवी दिली. जी माझ्यापैकी समकालीन कुठल्याही कलाकाराला मिळालेली नाही. त्याचवर्षी मी ‘सारेगमप’ हा शो जिंकलो. त्याचवर्षी पहिल्या सोफ्यावर प्रसाद ओक आणि मंजिरी ओक अशी नावे लिहीलेली होती. यालाच वाट बघणे असं म्हणतात”.
आणखी वाचा – Bigg Boss नंतर जान्हवी किल्लेकर पहिल्यांदाच गेली माहेरी, आईने औक्षण करत केले स्वागत, व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, मराठी सिनेसृष्टीतील सध्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये प्रसाद ओकचे नाव आवर्जून घेतले जाते. त्याने केवळ आपल्या अभिनयानेच नाही तर दिग्दर्शनानेही प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. त्याच्या ‘धर्मवीर’ या चित्रपटातील आनंद दिघे यांच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झालं. ‘धर्मवीर’ व ‘धर्मवीर २’नंतर प्रसाद ओक लवकरच त्याच्या आगामी चित्रपटांमधुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे त्याच्या आगामी चित्रपटांसाठी अनेक चाहते मंडळी वाट पाहत आहेत.