हिंदी मालिकाविश्व गाजवल्यानंतर आता अभिनेता अक्षय म्हात्रे मराठी मालिकाविश्वाकडे वळला आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पुन्हा लग्न करण्याच्या संकल्पनेवर आधारित ही मालिका आहे आणि या मालिकेत अक्षय म्हात्रे व अक्षया हिंदळकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. अक्षय हिंदी कलाविश्वात लोकप्रिय आहे. ‘ये दिल मांगे मोर’, ‘पिया अलबेला’ सारख्या मालिकांमध्ये त्याने भूमिका साकारली आहे. अक्षयचं काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं असून त्याची पत्नी हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. तिचं नाव आहे श्रेनू पारीख. श्रेनूने ‘इस प्यार को क्या नाम दूँ २’, ‘इश्कबाज’ सारख्या मालिकांमधून स्वतःचा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. (Akshay Mhatre and Shrenu Parikh Marriage)
श्रेनू व अक्षय यांची भेट २०२१ मध्ये झाली होती. ‘घर एक मंदिर’निमित्त त्यांची ओळख झाली. त्यानंतर ते अनेकदा एकमेकांना भेटले आणि त्यांच्यातील मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. कोरोना काळात शूटिंग करत असताना त्यांच्यात प्रेम झालं. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष आवडली होती. या मालिकेच्या सेटवर प्रेमात पडल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. मग २१ डिसेबंर २०२३ रोजी त्यांनी एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली. अक्षय हा मराठी असून त्याची पत्नी श्रेनू ही गुजराती कुटुंबामधील आहे. त्यामुळे लग्नावेळी दोघांच्या कुटुंबियांच्या काय प्रतिक्रिया होत्या. तसंच त्यांनी लग्न दोन्ही धर्मातील पद्धतीनुसार लग्न केल्याचे ‘इट्स मज्जा’च्या मुलाखतीत सांगितले. पाडवा स्पेशल मुलाखतीत दोघांनी त्यांच्या लग्नाबद्दल सांगितले.
आणखी वाचा – मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नीचं निधन, चार महिन्यांमध्येच मोडला होता संसार, नक्की काय झालेलं?
यावेळी दोघांनी त्यांचे लग्न मराठी व गुजराती अशा दोन्ही पद्धतीने केल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या लग्नात दोन्ही भटजी होते असंही म्हटलं. याबद्दल बोलताना श्रेनू असं म्हणाली की, “मी अक्षयच्या घरच्यांना अनेकदा भेटले होते आणि मला याची जाणीव झाली होती की, हे लोक पण माझ्या घरच्यांसारखेच आहेत. फक्त इतकंच की ते मराठी बोलतात आणि आम्ही गुजराती. मराठी व गुजराती या दोन्ही धर्मांत बऱ्यापैकी साम्य आहे. सण, संस्कृती व उत्सवांबाबत दोन्ही बऱ्यापैकी धर्मांत साम्य आहे. दिवाळी पाडवा मराठी लोकांमध्येही होतो आणि आमच्यातही होतो”.
पुढे अक्षय असं म्हणाला की, “माझ्या घरी लग्नाला घेऊन जातीबद्दल काही बंधने नव्हती. लग्नाआधी आम्ही खूप प्लॅनिंग केलं होतं. पण आमचं लग्न अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने झालं. म्हणजे साडी गुजराती पद्धतीची नेसायची की मराठी इथंपासून ते चार फेरे घ्यायचे की सात? यावर आमची चर्चा झाली. लग्न दोन्ही पद्धतीने करायचं हे आमचं आधीच ठरलं होतं. माझ्या आईचे फक्त इतकेच म्हणणे होते की आपल्या सर्व विधी वगैरे नीट होऊदेत”. यापुढे श्रेनू असं म्हणाली की, “आम्हाला कळलं की दोन्ही पद्धतीमध्ये खूप साम्यता आहे. गुजरातीमध्ये सात फेरे न होता चार होतात. पण माझी आई बोलली ठीक आहे तीन फेरे अजून घे. त्यानंतर आमच्या लग्नात दोन्ही मराठी व गुजराती भटजी लग्न लावायला होते”.