लोकप्रिय मराठी अभिनेता प्रसाद ओक हा गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. नाटक, मालिका व चित्रपटांमधून विविधांगी भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. तो केवळ अभिनेता म्हणून नाही, तर उत्तम गायकही आहे. त्याचबरोबर तो दिग्दर्शन क्षेत्रातही आपलं नशीब अजमावत असून ‘हिरकणी’, ‘चंद्रमुखी’ या दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन त्याने केलं आहे. प्रसाद सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून तो नेहमीच विनोदी व्हिडीओजद्वारे चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसतो. नुकताच त्याने इंस्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला, जो प्रचंड व्हायरल होत आहे. (Prasad Oak shares funny Video)
शेअर केलेल्या या व्हिडीओला त्याने “सत्यघटनेवर आधारित” असं कॅप्शन दिलं आहे. तर या व्हिडीओमध्ये तो असं म्हणतो, “बायको हे जाम बुचकळ्यात पडणारं प्रकरण हे राव! बायकोला बचत करायची असते, पण त्याचवेळेस तिला महागाचे कपडे घ्यायचे असतात. ती महागाचे कपडे घेते, पण तरी वेळ आली की पार्टीच्या वेळेला म्हणते माझ्याकडे घालायला कपडेच नाही. तिच्याकडे घालायला कपडे नसतात, पण ती पार्टीच्या वेळेला सॉलिड कपडे घालून तयार होते. मात्र तरी ते तिला आवडलेलं नसतं. पण तिची अशी इच्छा असते की, नवऱ्याने आपलं कौतुक करायला हवं. नवरा कौतुक करतो, पण तिचा त्यावर विश्वास नसतो की हे कौतुक खरं आहे का खोटं? हुश्श… काय करायचं?”
प्रसादच्या या विनोदी व्हिडीओवर नेटकऱ्यांसह अनेक कलाकार विनोदी कमेंट करताना दिसत आहे. प्रसादची पत्नी मंजिरी ओक कमेंटमध्ये लिहिते, “प्रसाद तू यात खूप छान दिसत आहे. पण बाकी तू जे बोललास त्यात मला काही रस नाही.” तिच्या या कमेंटवर प्रसादने हसण्याचे इमोजी टाकले. तर अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने या व्हिडीओवर “हे मी माझ्या नाटकांत वापरू का?” असं प्रश्न केला. त्यावर तो “अरे बिनधास्त… तूच लिहिलं आहेस असं वाटेल लोकांना”, असं हटके उत्तर दिलं आहे. त्याचबरोबर नेटकरीदेखील या व्हिडीओवर कमेंट करत आहे. एक नेटकरी यावर म्हणाला, “इतकं पण खरं बोलायला नव्हतं पाहिजे. आता या वक्तव्यानंतर तुम्ही कुठे जेवण केलं?”. तर दुसरा नेटकरी, “मग लग्न करायचं की नाही हे गुंतवणूकीत टाकणारं प्रकरण आहे”, अशी कमेंट केली आहे.
हे देखील वाचा – प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक गौतम हलदर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, विद्या बालनच्या चित्रपटाचं केलं होतं दिग्दर्शन

दरम्यान, प्रसादने नुकतंच ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं असून त्याबद्दलची एक पोस्टदेखील त्याने लिहिली होती. त्याचबरोबर, तो ‘धर्मवीर २’, ‘जिलबी’ या चित्रपटाचे शूटिंगमध्ये व्यग्र आहे. शिवाय, तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. लवकरच प्रसादचे ‘वडापाव’ आणि ‘पठ्ठे बापूराव’ हे दोन दिग्दर्शित चित्रपट प्रदर्शित होणार आहे.