Aarti Solanki Video : बरीच अशी कलाकार मांडली आहेत जी माणुसकीच्या नात्याने म्हणा वा मैत्रीच्या नात्याने सहकलाकारालाही पुढे घेऊन जात असतात. बरेचदा अमुक अमुक कलाकाराने मदत केली, या कलाकाराने पाठिंबा दिला असं अनेक कलाकार सांगताना दिसतात. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने हे वक्तव्य खोडून काढत यावर भाष्य केलं आहे. अभिनेत्री आरती सोळंकी हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कलाकारांच्या पाठिंब्यावर भाष्य केलं आहे.
आरती सोळंकीने आजवर तिच्या विनोदी अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मात्र एका काळानंतर आरती सिनेसृष्टीपासून दुरावली. त्यावेळच्या तिच्या या कठीण प्रसंगाबाबत आरतीने ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमादरम्यान भाष्य केलं. यावेळी बोलताना तिने एका अभिनेत्रीचा आलेला अनुभव शेअर केला.
यावेळी बोलताना आरती म्हणाली, “माझे जे काही मित्रमंडळी आहेत त्या सर्वांना माहित आहे की, मी किती गरिबीतून वर आले आहे. आणि आम्ही एकत्र तेव्हा होतो, तेसुद्धा गरिबीतूनच स्ट्रगल करत करत श्रीमंत झाले आहेत.”
आरती पुढे म्हणाली, “आज ते मला भेटले की बोलतात, मुन्नी, घरी काय लागलं तर सांग हा, आईला किंवा तुला घरी पैसे वगैरे कमी पडले तर सांग. ऐनवेळेस काही वाटलं तर आम्हाला अगदी हक्काने न संकोच करता सांग. पण हीच माणसं जी तोंडावर गोड बोलतात ती माझ्या मागून वाईट बोलतात. आणि अशी बरीच उदाहरणं आहेत. एक उदाहरण देते मी, एक अभिनेत्री आहे, जी सिनियर आहे. तिचं आणि माझं नातं हे आई मुलीसारखं आहे. शूटिंगदरम्यान आम्ही बरेचदा एकत्र निघायचो, मी तिला माझ्या गाडीतून घरी सोडायची, आणायला जायचे. हे व्यवहाराचं मी मुद्दाम बोलतेय.”
त्या अभिनेत्रीबरोबरची कटू आठवण सांगत आरती म्हणाली की, “आज माझ्याकडे काम नाही आहे, मी जिकडे आहे तिथेच आहे आणि माझ्या बरोबरचे सगळेच पुढे गेले. सगळ्यांनी घर, गाडी घेतलं आहे. तर आज ती माझ्या परिस्थितीवर इतरांना बोलते. ज्या मुलीमुळे पाच-सहा महिने प्रवासाचा खर्च वाचला, तुझ्या मुलांचे लाड केले, त्यांना दोन सायकल गिफ्ट केल्या. या सायकल सुद्धा फुकट येत नाहीत ना. तर आज माझी परिस्थितीसुद्धा तिचं आहे, म्हणून ती मला त्या परिस्थितीवरून हिणवतेय. त्यामुळे हे सगळं पूर्णतः खोटं आहे की, आम्ही कलाकारांना आमच्याबरोबर पुढे घेऊन जातो, तर नाही असं काही नसतं.”