Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी ५’ हा शो आता अंतिम टप्प्यात आला आहे. ‘बिग बॉस मराठी’चा यंदाचा सीझन केवळ ७० दिवसांत संपणार आहे. याची अधिकृत घोषणा नुकतीच ‘बिग बॉस’कडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये या खेळात कोण बाजी मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि यासाठी स्पर्धकांमध्ये चढाओढ पहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’चे पाचव्या सीझनमधील प्रत्येक स्पर्धकाची चर्चा झालेली पाहायला मिळाली. या घरातील प्रत्येक स्पर्धकांना त्यांच्या चाहत्यांचा व प्रेक्षकॅनचा तुफान प्रतिसाद मिळाला. अशातच आता हा शो अंतिम टप्प्यात आला आहे. (Jaywant Wadkar supports Paddy Kamble)
त्यामुळे आपला आवडता स्पर्धक अंतिम टप्प्यात जावा यासाठी स्पर्धकांना मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे. अशातच या घरातील पॅडी कांबळेंसाठी मराठी अभिनेते जयवंत वाडकर यांनी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी पॅडीला पाठींबा देत तो या पर्वाच्या टॉप ३मध्ये जावा अशी इच्छाही त्यांनी या व्हिडीओमध्ये व्यक्त केली आहे. जयवंत वाडकरांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ढोल वाजत असून हा ढोल पॅडी यांना शुभेच्छा देण्यासाठी वाजत असल्याचे वाडकरांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
तसंच पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “पॅडी तुला खूप साऱ्या शुभेच्छा यार… तू एक दिलदार माणूस आहेस. तितकाच हुशार अभिनेताही आहेस. तुझ्याबदल काय सांगू… तुला वाजवता येतं, तुला नाचता येतं. गाता येतं, कॉमेडी करतोस. तितकीच गंभीर भूमिकाही तू उत्तम करतोस. यापेक्षा अजून काय सांगू. तुझ्याबद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे. तुझ्याकडे टायमिंग (व्यक्तशीरपणा) खूप आहे. ‘आजीबाई जोरात’च्या निमित्ताने निर्मिती सावंतकडून तुझे अनेक किस्से ऐकतो’.
यापुढे जयवंत वाडकरांनी एक किस्सा सांगताना असं म्हटलं आहे की, “आपला ‘वऱ्हाड वाजंत्री’ हा चित्रपट करताना तुला सर्दी झाली होती आणि त्याची एक अनोखी नक्कल तुला करायची होती. तेव्हा आम्हाला इतकं हसायला यायचं की… इतकं कमाल टायमिंग होतं तुझं. तू नेहमीच समोरच्याला वाव दिला आहेस. हे तुझं काम आहे आणि ते तू करत आहेस, हे खरच खूप ग्रेट आहे. तुला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. पॅडी, तू ‘टॉप ३’मध्ये नक्कीच असणार आहेस”.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व आता अगदी रंजक वळणावर आलं आहे. दोन आठवड्यांमध्ये हा आवडता शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनावर कोण राज्य करणार आणि या पर्वाची ट्रॉफी कोण घेऊन जाणार? याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.