Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी ५’च्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. यंदाचा सीझन केवळ ७० दिवसांत संपणार आहे. याची अधिकृत घोषणा नुकतीच ‘बिग बॉस’कडून करण्यात आली आहे. आता शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये या खेळात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि यासाठी स्पर्धकांमध्ये चढाओढ पहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीचे पाचवे सीझन अनेक कारणांनी चर्चेत राहीलं. यापैकी चर्चेचं एक कारण म्हणजे अभिनेत्री जान्हवी किल्लेकर, बिग बॉसच्या घरातील जान्हवी तिच्या खेळामुळे लक्षात राहिलीच. पण त्याहून अधिक तिने पॅडी व वर्षा यांच्याबद्दल केलेल्या वकतव्यांमुळेही प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. (Janahvi Killekar Father Story)
जान्हवीने केलेल्या वकतव्यांमुळेही ती सोशल मीडियावर ट्रोल झाली. पण नुकत्याच झालेल्या एका भागात जान्हवीची हळवी बाजू प्रेक्षकांच्या समोर आली. डीपीने सांगितलेल्या कामावरुन जान्हवीने तिच्या वडिलांची एक संघर्ष कहाणी सांगितली आणि ही आठवण सांगताना तिच्या अश्रूंचा बांधही फुटला. यावेळी अभिनेत्री असं म्हणाली की, “लहानपणी शाळेची फी भरायची होती. पण घरात फार पैसे नव्हते. तेव्हा पप्पांना फक्त दोन अडीच हजार रुपये पगार होता. त्यावेळी किराणा सामानलाच ८००-९०० रुपये लागायचे. त्यामुळे मम्मीकडे शाळेची फी भरायला पैसे नस्याचे. एकदा मला आणि माझ्या बहिणीला शाळेबाहेर उभं ठेवलेलं, कारण आमची फी भरली नव्हती. पण पप्पांचा पगार संपला आहे. तर त्यांना ते कसं सांगायचं असं आम्हाला वाटायचं”.
यापुढे ती असं म्हणाली की, “त्याकाळी रक्त विकलं की पैसे मिळायचे. तर तेव्हा पप्पांनी त्यांचं रक्त विकलं होतं. पप्पांना एका हाताचं रक्त विकून १५० रुपये मिळाले होते. शाळेची फी ३५० रुपये होती आणि तेव्हा एका व्यक्तीकडून फक्त एकदाच रक्त घेतलं जायचं. तेव्हा पप्पांनी तोंडालं रुमाल बांधून पुन्हा त्याच हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्त दिलं. मग ३०० रुपये झाले. मग मम्मीकडून आणखी ५० रुपये घेतले. असं करुन त्यांनी माझ्या शाळेची ३५० रुपये फी भरली. असं ते बरेच वर्ष करत होते. मग पप्पांच्या हाताला काही झालं आहे हे नंतर कळलं आणि मम्मी रडायला लागली”.
आणखी वाचा – “माझ्या आयुष्यातील…” कार्तिकी गायकवाडची नवऱ्यासाठी रोमॅंटिक पोस्ट, फोटोने वेधलं लक्ष
यापुढे जान्हवी भावुक होत असं म्हणाली की, “पप्पा सांगत नव्हते. मग मम्मी रडायला लागली तेव्हा कळलं की पप्पांनी असं काहीतरी केलं आहे. आता असं कुठे तरी वाटतं की, पप्पांना त्या नोकरीतून मुक्त करायचं आहे. लोकांना वाटतं की मी अभिनेत्री आहे तर खूप पैसे आहेत. पण खरी परिस्थिती काहीतरी वेगळीच असते. अजून मी इतकं काही कमावलंच नाही. त्यामुळे मी आत्ता पण त्यांना मुक्त नाही करु शकत. पण मी इथून बाहेर गेल्यानंतर मी त्यांना नक्की सांगणार की तुम्ही आता आराम करा. माझी एवढीच इच्छा आहे आणि मला इतकंच करायचं आहे”.