‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘जाऊ बाई गावात’ हा नवीन रिअॅलिटी शो सुरू झाला असून या शोचे सूत्रसंचालन अभिनेता हार्दिक जोशी करत आहे. अल्पावधीतच या शोला खुप लोकप्रियता मिळाली आहे. अनेकांनी हा शो त्यांना आवडत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या शोमध्ये अनेक मान्यवर मंडळी सहभागी होत असतात. महेश मांजरेकर, कुशल बद्रिके यांच्यासह अनेकांनी या शोमध्ये सहभाग घेतला आहे. अशातच येत्या एपिसोडमध्ये या शोमध्ये अभिनेता सागर कारंडेने पोस्टमनच्या भूमिकेत या शोमध्ये एण्ट्री होणार आहे.
सागर कारंडेने पोस्टमनच्या भूमिकेत या शोमधील स्पर्धकांसाठी भावुक पत्रांचे वाचन केले आणि या पत्रवाचनाने अनेकांच्या डोळ्यात पानी आले. यावेळी सागरने हार्दिकसाठी काही दिवसांपूर्वीच निधन झालेल्या त्याच्या वहिनीचे पत्रवाचन केले आणि यांमुळे अभिनेता आपल्या वहिनीच्या आठवणीत भावुक झाला असल्याचे पाहायला मिळाले. या पत्रवाचनानंतर हार्दिकने त्याच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.
यावेळी त्याने आपल्या भावना व्यक्त करत असे म्हटले आहे की, “मी आधीपासूनच असं ठरवलं होतं की हा शो मी फक्त माझ्या वहिनीसाठीच करेन. हा शो प्रदर्शित होण्याचच्या एक महिना आधी या शोचा प्रोमो जाणार होता. मात्र त्यादिवशी आमच्या घरी वहिनीच्या तब्येतीमुळे गंभीर परिस्थिती होती आणि त्यामुळे मी झी मराठीच्या सर्व वरिष्ठांना फोन करुन सांगितले की, तुम्ही कृपया हा प्रोमो थांबवा. कारण मी हा शो करु शकत नाही. माझ्यामुळे तुमचं नुकसान व्हायला नको.”
आणखी वाचा – “दुसऱ्याचं वाईट चिंतण्यापेक्षा…”, ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीची पोस्ट चर्चेत, म्हणाली, “स्वतःच्या प्रगतीकडे…”
यापुढे त्याने असं म्हटलं की, “माझी वहिनी तेव्हा गंभीर परिस्थितीत होती पण तिला कळत होतं. तिच्या तोंडावर ऑक्सीजनचा मास्क होता. तेव्हा तिने मला जवळ बोलावलं. माझा हात हातात घेतला आणि हातवारे करत हा शो कधीही सोडू नकोस असं सांगितलं. पण नशिबाचा खेळ असा की ती हा शो बघायला नव्हती. पण मला एक एक समाधान आहे की, या शोच्या पहिल्या प्रोमोचे फोटो तिने बघितले होते. ती मला नेहमी म्हणायची की “तु एक मोठा कलाकार होणार” यावर मी तिला “मी मोठा कलाकार होईन की नाही माहीत नाही, पण मी एक चांगला कलाकार नक्की होईन” असं म्हणायचो. आणि तिला दिलेला हा शब्द मी नेहमीच पूर्ण करत राहीन. त्याचबरोबर मी माझ्या पुतणीची व माझ्या भावाची काळजी घेईन असा शब्दही दिला आहे. आजपर्यंत त्यांनी मला सांभाळलं आहे. माझ्याकडे जेव्हा काहीही नव्हतं तेव्हा तिनेच मला सगळं काही दिलं”