भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या काल (१९ नोव्हेंबर) झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया या संघाने भारताचा पराभव करत विजय मिळवला. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाल्याने तमाम क्रिकेटप्रेमींची निराशा झाली. भारताने ऑस्ट्रेलियाला २४१ धावांचं आव्हान दिलं होतं. ते आव्हान ऑस्ट्रेलियाच्या संघाने ४३ षटकांतच पूर्ण केलं आणि भारताचा पराभव झाला.
यावर सामान्य जनतेबरोबरच अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली. तर अनेकांनी भारतीय संघाला पाठिंबा दर्शवला. अशातच या सामन्याबद्दल अभिनेता गश्मीर महाजनीने केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली. त्याने थेट बिग बींचा उल्लेख करत इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – कोल्हापुरी मिसळीवरून केलेल्या संकर्षण कऱ्हाडेच्या कवितेने वेधलं लक्ष, म्हणाला, “तुला पाहिलं की…”
गश्मीरने “बच्चन साहेबांनी लपून मॅच पाहिली” अशी गंमतीशीर स्टोरी इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. यासोबत त्याने दोन इमोजीदेखील पोस्ट केले होते. या स्टोरीचा संदर्भ असा आहे की, विश्वचषक स्पर्धा २०२३च्या उपांत्य सामन्यात भारत व न्यूझीलंड हे दोन संघ एकेमकांविरुद्ध लढले होते. या सामन्यात भारताने ७० धावांनी न्यूझीलंडचा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. तेव्हा अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर “जेव्हा मी सामना पाहत नाही, तेव्हा आपण जिंकतो,” असं म्हटलं होतं. यावरूनच गश्मीरने ही गंमतीशीर पोस्ट केली आहे.
गश्मीरने या स्टोरीआधी लेक व्योमचा एक फोटो शेअर करत ‘गो इंडिया गो’ म्हणत भारतीय संघाला पाठिंबा दर्शवला होता. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत सर्व सामने जिंकून भारताने अंतिम सामन्यात धडक मारली होती. पण ऑस्ट्रेलियाच्या संघाने २४१ धावांचं आव्हान ४ गडी गमावून पूर्ण केलं आणि भारताला अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला.