Gashmeer Mahajani On Family : दमदार अभिनय, स्टायलिश अंदाज यासाठी ओळखला जाणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे गश्मीर महाजनी. ‘देऊळ बंद’,’सरसेनापती हंबीरराव’ अशा अनेक चित्रपटांमध्ये अभिनय साकारत गश्मीरने प्रेक्षकांची मनं जिंकली. चित्रपट, मालिका यांसह गश्मीर सोशल मीडियावर देखील चांगलाच सक्रिय असतो. बरेचदा सोशल मीडियाद्वारे तो चाहत्यांशी संपर्कही साधताना दिसतो. प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्याला बरेचदा ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर तर गश्मीरला नेटकऱ्यांच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागले. यावेळी गश्मीरने बरेचदा मौन धारण केलेलं पाहायला मिळालं. तर काही वेळा त्याने या चर्चांना, टोमण्यांना सडेतोड उत्तर दिलं.
गश्मीरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या कुटुंबाच्या पाठिंब्याबाबत भाष्य केलं आहे. गश्मीर महाजनीने नुकतीच ‘व्हायफळ’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने त्याच्या बालपणाविषयी, त्याच्या करिअरबाबत व कुटुंबाबत अनेक भाष्य केलं. गश्मीर म्हणाला, “माझं कुटुंब, आई यांनी खूप पाठिंबा दिला. मी एकही चित्रपट केला नव्हता, तेव्हा मी लग्न केलं. त्यावेळी मी सर्वात कठीण काळातून जात होतो, म्हणून मी लग्न केलं. त्याचं कारण असंही होतं की, मला गौरी आवडली होती आणि मला तिच्याबरोबर लग्न करायचंच होतं. आपण असा विचार करतो, चार पैसे येऊ देत मग लग्न करतो; पण मला असं वाटलं की लग्न केल्याने चार पैसे येतील. आणि त्यानंतर सिनेमावर जास्त लक्ष केंद्रित करता येईल. अनेकांनी मला सल्ले दिले की लग्न केल्यानंतर भावनिक स्थैर्यता मिळेल. त्यामुळे त्या व्यक्तीला चार वर्षे दूर ठेवणं आणि आपण आपला संघर्ष करत बसणं आणि परत नैराश्यात जाणं. कारण जे सगळं सकारात्मक वाटतंय तसा सतत प्रवास सकारात्मक नाही झाला”.
पुढे तो म्हणाला, “मी १५ ते १७ या काळात काम केलं असेल, पण १७ ते १८, १९ चा काळ होता जेव्हा मी प्रचंड नैराश्यात होतो. मग परत नैराश्यातून बाहेर येत मी सात-आठ वर्ष खूप चांगलं काम केलं. त्यांनतर २४ ते २८ या चार वर्षांत मी पुन्हा प्रचंड नैराश्यात होतो. मी खूप दारू प्यायचो. दिवसभर दारू प्यायचो. मी स्वत:ला सहा महिने एका रुममध्ये कोंडून घेतलं होतं. मी बाहेर जायचो नाही. मी कोणाचे फोन उचलायचो नाही. कारण मी एका चित्रपटाची निर्मिती केली होती व त्याचे दिग्दर्शनही केले होते. ‘नील डिसूजा परत आलाय’ असं त्या चित्रपटाचं नाव होतं. सुहास शिरवळकरांच्या ‘प्राक्तन’ नावाच्या पुस्तकातून ती कथा घेतली होती. त्यामध्ये अशोक मेहता साहेब हे माझे सह-निर्माते होते. त्या चित्रपटाचं शूटिंग सुरु असतानाच त्यांचं निधन झालं. ती फिल्म चालली नाही. मी घरावर कर्ज काढून ती फिल्म केली होती. त्यातून मी पदार्पण करणार होतो”.
गश्मीर पुढे असंही म्हणाला, “त्याच्यानंतरचे दोन-तीन वर्षे डिप्रेशनमध्ये गेले. मग मी लग्न केलं आणि अभिनेता म्हणून काम करायला सुरुवात केली. तर चढ-उतार कायम चालू असतात, पण यामधून मला बाहेर आणण्यासाठी माझ्या कुटुंबानं खूप मदत केली आणि आता मुलगा झाल्यानंतर तर कधी कधी मनात असे वेगळे विचार येतात की काही गोष्टी ठरवल्या तशा घडत नाहीत. पण कायम आई, पत्नी, मूल, बहीण हे सगळे बरोबर असतात. असं काही नाही की त्यांनी काही समजवण्याची गरज आहे. फक्त त्यांचं जवळ असणं कधी कधी खूप महत्त्वाचं असतं. कोणी काही करायची गरज नसते, ते असतात हे फार महत्त्वाचं असतं”, असे म्हणत गश्मीर महाजनीने कुटुंबाच्या पाठिंब्याबाबत भाष्य केलं.