अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपं आहे. सिनेसृष्टीतील आदर्श जोडपं म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. गेली अनेक दशकं ऐश्वर्या व अविनाश नारकर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन कपल म्हणूनही त्यांची लोकप्रियता आहे. वयाची पन्नाशी ओलांडली तरी दोघांचाही फिटनेस, ऊर्जा आणि उत्साह आजही तितकाच असल्याचे पाहायला मिळतं. अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांचे रील व्हिडीओ व्हायरलही होतात. अविनाश-ऐश्वर्या यांच्या प्रमाणे त्यांचा मुलगादेखील मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. (Avinash Narkar Wants Work With Son)
अमेय असं ऐश्वर्या-अविनाश यांच्या लेकाचं नाव आहे. अमेयने देखील आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत कलाक्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला असून अविनाश यांना लवकरच रंगभूमीरवर त्यांच्या मुलाबरोबर काम करायची इच्छा आहे. याबद्दल त्यांनी ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. ज्येष्ठ नाटककार जयवंत दळवी यांच्या लेखणीतून साकारलेलं ‘पुरुष’ हे नाटक ४० वर्षांनंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर येतं आहे आणि या नाटकात अविनाश नारकरांचीही महत्त्वाची भूमिका आहे. याच नाटकानिमित्त अविनाश यांनी ‘इट्स मज्जा’शी खास संवाद साधला.
यावेळी ते आपल्या मुलाबद्दल असं म्हणाले की, “अमेयने पुण्याच्या ललित कला अकॅडमीमधून प्रशिक्षण घेतलं. त्यादरम्यान, त्याने एक नाटक दिग्दर्शित केलं होतं आणि आता सध्या तो अमेरिकेत त्याचे उच्चशिक्षण घेत आहे. आई-वडीलांना अभिमान वाटावा अशी गोष्ट म्हणजे तो तीन वर्षे अमेरिकेत आहे. तिथल्या येल यूनिव्हर्सिटीमध्ये एकूण १,६०० मुलांपैकी १६ मुलं निवडली गेली, त्या १६ मुलांमध्ये त्याचा नंबर लागला आणि यात १००% स्कॉलरशिप घेऊन तो आता तिथे शिक्षण घेत आहे. तर मला असं वाटतं की, तो आता जे काही ज्ञान आत्मसात करत आहे, त्याचा इथे येऊन उपयोग करेल आणि त्याचा भाग म्हणून त्याने जर मला कोणत्या नाटकात काम करण्याची संधी दिली तर मला नक्कीच आवडेल”.
पुढे ते असंही म्हणाले की, “पण यासाठी मी त्याला कोणता विषय देणार नाही. जागतिक आणि आंतरराष्ट्रीय विचार घेऊन तो इथे येणार आहे. तर त्याच्या डोक्यात जे विचार असतील त्याचा भाग मला व्हायला नक्की आवडेल”. दरम्यान, अमेयला अभिनय, नृत्याची आवड बालपणापासून आहे. रुईया महाविद्यालयातून त्याने बी.एम.एम.मधून (संज्ञापन आणि माध्यम विभाग) शिक्षण घेतलं आहे. तो रुईया नाट्यवलयमध्ये खूप सक्रिय होता. या माध्यमातून त्याने बऱ्याच एकांकिका व नाटकांमध्ये काम केलं आहे.