गंभीर आजारपणातून बरे होतं अभिनेते अतुल परचुरे यांनी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा कमबॅक केलेलं पाहायला मिळत आहे. झी नाट्य गौरव सोहळ्यादरम्यान अतुल यांची खास उपस्थिती असलेली पाहायला मिळतेय. अतुल यांच्या कमबॅकचे व्हिडीओ झी मराठी वाहिनीच्या ऑफिशिअल पेजवरुन पोस्ट करण्यात आले आहेत. आजवर अतुल यांनी त्यांच्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र मधल्या काही कळत अतुल यांना गंभीर आजाराचा सामना करावा लागला. आजारपणाशी लढा देत अतुल यांनी सिनेसृष्टीतील त्यांचा प्रवास सुरु केला आहे. (Atul Parchure Shared Funny Incident)
‘झी नाट्य गौरव’ सोहळ्यासाठी नाटक, किस्से आणि आठवणी या सेगमेंटमध्ये अतुल यांनी नाटकादरम्यानचा एक गमतीशीर किस्सा सांगितला. झुरळांना प्रचंड घाबरणाऱ्या अतुल यांची रंगमंचावर झालेली फजिती त्यांनी या किस्स्यांद्वारे सांगितली आहे. अतुल म्हणाले, “मला आठवतंय व्यावसायिक नाटकात तुम्हाला कुठल्या ना कुठल्या प्रसंगाला सामोर जावं लागतं, हे आपल्या कल्पनेत सुद्धा नसतं. म्हणजे मी ‘नातीगोती’ नावाचं नाटक करत होतो. याला खूप वर्ष झाली आहेत. बाहेरगावी प्रयोग व्हायचे, बाहेरगावी दौरे व्हायचे. नगर किंवा कुठेतरी असा प्रयोग होता, तेव्हा तिथल्या थिएटरचा जो पडदा होता. तो माझ्या मते तीन महिने वगैरे उघडलेला नव्हता. नाटकासाठी तो उघडला गेला”.
पुढे ते म्हणाले, “तो पडदा उघडला गेल्यानंतर त्याच्यात इतके पशुपक्षी म्हणजे राणी बागमध्ये देखील एवढे पशुपक्षी नव्हते तेवढे त्या पडद्यात होते. झुरळ, पाली, डास वगैरे होते. ते साफ करुन आमचा प्रयोग सुरु झाला आणि त्या प्रयोगात ‘नातीगोती’मध्ये स्वाती चिटणीस माझ्या आईची भूमिका करत होती. ती साडी कपाटातून बाहेर काढते आणि नेसायला जाते, असा एक प्रसंग होता. त्यामुळे तिने साडी कपाटातून बाहेर काढली आणि त्याच्यात दोन मोठी झुरळं होती. स्वातीने ती साडी दिली फेकून ती आत निघून गेली. या झुरळांबरोबर स्टेजवर मी काम नाही करु शकत, असं तिने सांगितलं”.
पुढे अतुल म्हणाले, “मी त्या नाटकात मतिमंद मुलाचं काम करत होतो. मी स्टेजवर बसलो होतो. ती झुरळं माझ्या दिशेने यायला लागली. मी झुरळांना घाबरतो. मी माझ्या बेरिंगमध्ये कसं तरी करुन झुरळांना ढकलायचा प्रयत्न करत होतो. शेवटी ती झुरळं माझ्याकडे येताना दिसली तसा मी देखील उठून आतमध्ये गेलो. बॅकस्टेजवाल्या आमच्या सहकार्याने तिथे येऊन ती झुरळं मारली आणि पुढचा प्रयोग सुरु झाला. पण व्यावसायिक नाटकात अशा गोष्टी घडू शकतात. किंबहुना व्यावसायिकच नाही तर नाटकात अशा गोष्टी घडू शकता. त्यामुळे नाटक हे तुम्हाला नुसतं मनोरंजन देत नाही तर नाटक प्रसंगाना तोंड द्यायचं याची एक जीवंत शाळा आहे. त्यात तुम्ही जगातल्या कुठल्याही प्रसंगाला तोंड देऊ शकता”, असं ते म्हणाले.