Actor Atul Parchure Passes Away : आपल्या बहारदार अभिनयाच्या जोरावर मराठी-हिंदी चित्रपटसृष्टी, रंगमंच आणि टीव्हीवरील मालिका गाजवणारे अतुल परचुरे यांचं सोमवारी संध्याकाळी निधन झालं. ते ५७ वर्षांचे होते. काही काळापूर्वी त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. यावर त्यांनी यशस्वी मात करत रंगभूमीवर पुनरागमनदेखील केले होते. मात्र पुन्हा बळावलेल्या आजारामुळे या हरहुन्नरी कलाकाराची प्राणज्योत मालवली. अतुल यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांसह मराठी मनोरंजन विश्वावरही शोककळा पसरली आहे. (Atul Parchure Death)
अतुल परचुरे यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बसला असून न भरुन निघणारी एक पोकळी निर्माण झाली आहे. अतुल परचुरे यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी दुःख व्यक्त केले. आज (मंगळवार १५ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
आणखी वाचा – आजारपणामध्ये अशी होती अतुल परचुरे यांची अवस्था, पत्नीने सांगितली होती सत्य परिस्थिती, आवाजही गेला होता अन्…
मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळींनी सोशल मीडियावर अतुल यांच्या आठवणीत भावुक पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. संगीतकार-गायक सलील कुलकर्णी, अभिनेत्री श्रुती मराठे, अभिनेता शशांक केतकर, सिद्धार्थ चांदेकर, पॅडी कांबळे, सचिन व सुप्रिया पिळगावकर, शुभांगी गोखले, सुव्रत जोशी, सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, गौरव मोरे, सई ताम्हणकर, शरद केळकर अशा अनेकांनी भावुक पोस्ट शेअर केल्या आहेत.
आणखी वाचा – “त्याचं जाणं आयुष्यभरासाठी दुःख”, अतुल परचुरे यांच्या निधनामुळे डगमगले अशोक सराफ, म्हणाले, “जवळचा मित्र…”
अतुल परचुरे गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाने त्रस्त होते. या जीवघेण्या आजारावर त्यांनी यशस्वीपणे मात केली होती मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती पुन्हा ढासळली. ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकातून अतुल परचुरे रंगभूमीवर झळकणार होते, पण अचानक त्यांचे निधन झाले आहे. परचुरे यांनी साकारलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. पु. ल. देशपांडे यांच्यासमोर त्यांचीच व्यक्तिरेखा ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकात उत्तम पद्धतीने साकारली. त्यांचा ‘अलिबाबा आणि चाळिशीतले चोर’ हा शेवटचा चित्रपट होता.