स्वतःच, हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि हे स्वप्न सत्यात उतरावं म्हणून प्रत्येकजण प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतो. दिवस-रात्र मेहनत करत प्रत्येकजण स्वतःला सिद्ध करत स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी झटत असतो. बरीच कलाकार मंडळीही सोशल मीडियावरुन नवं घर घेतलं असल्याची गुडन्यूज चाहत्यांसह शेअर करताना दिसतात. अहोरात्र मेहनत करत ही कलाकार मंडळी त्यांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करतात. अशातच एका मराठमोळ्या विनोदी कलाकाराचं नवं घर, हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. हा अभिनेता म्हणजे अंशुमन विचारे. (Anshuman Vichare Emotional)
सिनेसृष्टीत कोणीही गॉडफादर नसताना अंशुमनने स्वबळावर स्वतःच स्थान निर्माण केलं. सुरुवातीला चाळीत दिवस काढल्यानंतर अंशुमन फ्लॅटकडे वळला. आई-बाबांना घेऊन फ्लॅटमध्ये राहता यावं अशी त्याची इच्छा होती. आणि अखेरीस फ्लॅटमध्ये राहण्याचं स्वप्न मेहनतीच्या जोरावर अंशुमनने पूर्ण केलं. अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जात अंशुमनने सिनेसृष्टीतील त्याचा प्रवास सुरु ठेवला. एक उत्तम माणूस, एक उत्तम कलाकार, एक वडील, एक नवरा, एक मुलगा अशा अनेक जबाबदाऱ्या अंशुमन परिपूर्णपणे साकारताना दिसत आहे.
हक्काच्या घराची चावी हातात आली तेव्हा सर्वात आधी डोळ्यासमोर कोणाचा चेहरा आला?, असा प्रश्न अंशुमनला विचारण्यात आला. यावर उत्तर देण्याआधीच अंशुमनचे डोळे पाणावले. उत्तर देत, “आई-बाबा”, असं म्हणाला. आणि त्याला अश्रू अनावर झाले. अंशुमन स्वतःला सावरत पुढे म्हणाला, “आम्ही खूप चाळीत आयुष्य काढलं. मग माझी इच्छा होती की, त्यांनी फ्लॅटमध्ये राहावं. पण एका वर्षात माझी आई गेली. त्यामुळे मी अस्वस्थ झालो. आणि त्या दोघांचा चेहरा समोर आला”.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीकडून दुकानदारांचा खोटेपणा उघड, बुरशी आलेले पदार्थ विकत होते अन्…; फोटो व्हायरल
फूबाईफू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या अंशुमनने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावर तो खूप सक्रिय असतो. आपल्या कुटुंबाबरोबरचे व्हिडीओ सतत शेअर करत असतो. त्याची पत्नी पल्लवी विचारे देखील मजेशीर व्हिडीओ शेअर करत असते. त्यामुळे विचारे कुटुंब नेहमी चर्चेत असतं.