अभिनेत्री योगिता चव्हाण सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरात खेळ खेळते आहे. पहिल्याच आठवड्यात तिला घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट करण्यात आले होते, मात्र अभिनेत्रीला तिच्या प्रेक्षकांनी मत दिले आणि सुरक्षित केले. पहिल्या आठवड्यात योगिता गप्प राहिली असली तरी दुसऱ्या आठवड्यात तिला गेम समजला आहे. ६ ऑगस्टच्या एपिसोडमध्ये तिने ‘बुलेट ट्रेन’चा टास्कही खेळला, त्यामध्ये खेळताना झालेल्या धक्काबुक्कीदरम्यान ती रडली आणि तिने जिंकूनही दाखवलं. कॅप्टनची निवड करण्यात योगिताने महत्त्वाची भूमिका निभावली. तिनेच अंकिता प्रभू वालावलकर या तिच्या बाजूने असणाऱ्या स्पर्धकाची कॅप्टन म्हणून निवड केली. ‘बिग बॉस’च्या घरातील योगिताच्या खेळाबद्दल तिच्या नवऱ्याने भाष्य केलं आहे.
‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत योगिताचा नवरा म्हणजेच अभिनेता सौरभ चौघुलेने भाष्य केलं आहे. यावेळी सौरभला त्याची या घरात वाइल्ड कार्ड एण्ट्री होणार का? याबद्दल विचारण्यात आले. याचे उत्तर देत सौरभने असं म्हटलं की, “मी आता काहीच सांगू शकत नाही. माझे इतर काम चालू आहे. आगामी कामाबद्दल माझी अनेक ठिकाणी बोलणी सुरु आहेत आणि ‘बिग बॉस’ म्हटलं की कॉन्ट्रॅक्ट (करार) आलंच तर मी कदाचित त्या गोष्टींमध्ये अडकलो तर माझ्या इतर संधी आहेत, ज्या गोष्टी मी प्लॅन करुन ठेवल्या आहेत. त्या पूर्ण होऊ शकणार नाहीत. म्हणून माझा या घरात सध्या जायचा काही विचार नाही. बायको खेळत आहे तर मी फक्त बाहेरून ‘मम’ म्हणेन”.
यापुढे त्याने योगितासह त्यालादेखील या शोसाठी विचारणा झाली असल्याचे सांगितलं. याबद्दल त्याने असं म्हटलं की, “आम्हा दोघांना या शोसाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र माझे काही नवीन प्रोजेक्ट्स सुरु आहेत. मला काही गोष्टी करायच्या होत्या. ‘बिग बॉस’ हे माझं स्वप्न असतं आणि मी जर आतमध्ये गेलो असतो तर मी माझे १०० टक्के देऊन खेळलो असतो. पण ‘बिग बॉस’ हे काय माझं स्वप्न नाही. माझ्याकडे वेळ असता आणि इतका वेळ मी या शोसाठी देऊ शकलो असतो किंवा मालिकांव्यतिरिक्त मला वेगळं काहीतरी करायचं म्हणून कदाचित मी गेलोही असतो. मला आवडलं असतं जायला आणि आताच्या स्पर्धकांपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने खेळलो असतो. पण मी कुटुंबाशी खूप जोडलेलो आहे त्यामुळे मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही”.
आणखी वाचा – पुन्हा एकदा ‘साडे माडे तीन’, तब्बल १७ वर्षांनी सिक्वेलची घोषणा, ‘हा’ मुख्य अभिनेता करणार दिग्दर्शन
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या सीझनमध्ये पहिल्या दिवसापासून भांडणं होत आहेत. स्पर्धकांवर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीकाही केली जात आहेत. याबद्दल सौरभने अनेकदा सोशल मीडियाद्वारे भाष्य केलं आहे. अशातच त्याने ‘इट्स मज्जा’च्या मुलाखतीत त्याच्या घरातील वाईल्ड कार्ड एण्ट्रीबद्दलही भाष्य केलं आहे.