Bigg Boss Marathi season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं नवं पर्व आता दुसऱ्या आठवड्यात येऊन पोहोचलं आहे. अगदी पहिल्या दिवसापासून या पर्वाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. एका मागोमाग आलेले हे स्पर्धक एकमेकांच्या वरचढ ठरले. यंदाच्या पर्वात गायक, कीर्तनकार, अभिनेते, अभिनेत्री, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर या सर्वांना संधी मिळाली. प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करण्यासाठी लढताना दिसत आहेत. पहिल्या आठवड्यात तब्बल १६ स्पर्धकांपैकी कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील यांना ‘बिग बॉस’च्या घराचा निरोप द्यावा लागला. प्रेक्षकांनी दिलेल्या वोटींगनुसार पुरुषोत्तम दादा पाटील यांना कमी मत पडले आणि त्यांना ‘बिग बॉस’ला राम राम केलं.
‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ मध्ये सहा सदस्यांपैकी वर्षा उसगांवकर, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, योगिता चव्हाण व धनंजय पोवार हे स्पर्धक सुरक्षित झाले आणि पुरुषोत्तम दादा पाटील या स्पर्धकाचा या घरातील प्रवास संपला. ‘बिग बॉस’च्या घरातून निघताना पुरुषोत्तम दादा यांच्या एका कृतीने समस्त महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मन जिंकली. ‘बिग बॉस’च्या घरातून एक्झिट घेताना पुरुषोत्तम दादा यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संतांचा जयजयकार केला. त्यांच्या या कृतीने साऱ्यांची मन जिंकली आणि त्यांचं कौतुक करण्यात आलं.
तर ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या आठवड्यात नॉमिनेशन प्रक्रियेत कोणताच स्पर्धक बाद झाला नाही. त्यामुळे सर्वांसाठी ही दिलासा देणारी बाब ठरली. अशातच पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या पुरुषोत्तम दादा पाटील या स्पर्धकाने सोशल मीडियावरुन केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर करत पुरुषोत्तम दादा पाटील यांनी “मला ‘बिग बॉस’च्या घरात अजून एक आठवडा संधी मिळायला पाहिजे होती. तुम्हाला काय वाटतं अवश्य सांगा”, असं म्हटलं आहे. पहिल्या आठवड्यात नॉमिनेट आणि दुसऱ्या आठवड्यात नॉमिनेट न केल्याने पुरुषोत्तम दादा पाटील यांनी ही इच्छा बोलून दाखविली.
पुरुषोत्तम यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत आपलं मत मांडलेलं दिसत आहे. “कोणाकोणाला वाटत आहे दादांबरोबर अरबाजने धोका केला”, “संधी मिळायलाच पाहिजे कारण ते असं झालं काही घडायच्या आतच होत्याचं नव्हतं झालं. त्यामुळे तुम्हालाही जास्त वेळ मिळाला नाही. वाईल्ड कार्ड एंट्री झाली पाहिजे असं माझं मत आहे”, “तुम्ही तीन महिने आत राहू शकला असतात दादा”, अशा अनेक कमेंट करत त्यांना पाठिंबा दर्शविला आहे.