मराठी मनोरंजन क्षेत्रातील आघाडीच्या लोकप्रिय जोड्यांमध्ये हेमंत ढोमे व क्षिती जोग यांचे नाव घेतले जाते. हेमंत व क्षिती हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असलेले बघायला मिळतात. एकमेकांसाठी ते सोशल मीडियावर अनेक पोस्टदेखील शेअर करताना दिसतात. ७ डिसेंबर २०२४ रोजी दोघांच्याही लग्नाला १२ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने हेमंतने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत राहिली. हेमंतने दोघांचाही खूप गोड फोटो शेअर करत “या वेडेपणाचा एक तप पूर्ण. असाच वेडेपणा चालू ठेऊ. बाकी काय होईल मग आपोआप. लव्ह यु पाटलीण बाई”. असं लिहिलं होतं. आशातच आता हेमंतच्या दुसऱ्या पोस्टनेही सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (hemant dhome on kshitee jog)
क्षितीचा आज म्हणजे १ जानेवारी रोजी वाढदिवस असतो. या दिवसाचे निमित्त साधून हेमंतने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने क्षितीबरोबरचे काही रोमॅंटिक फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने लिहिले की, “पाटलीणबाई आज तुमचा जन्म झाला नसता तर काही मजाच आली नसती! बाकी आपलं सेलिब्रेशन तर थांबत नसतं. Happywala Birthday my love”. या हटके शुभेच्छा सगळ्यांच पसंत पडल्या आहेत. अनेक कलाकार व चाहत्यांनी क्षितीला वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हेमंत व क्षिती हे २०१२ साली लग्नबंधनात अडकले. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला होता. ‘सावधान शुभमंगल’ या नाटकाच्या तालमीदरम्यान भेट झाली होती. त्यावेळी त्यांच्यामध्ये मैत्री झाली आणि कालांतराने त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान हेमंत व क्षिति ‘झिम्मा २’ या चित्रपटाच्या निमित्ताने चांगलेच चर्चेत आले होते. २०२१ साली आलेल्या ‘झिम्मा’ च्या यशानंतर त्यांनी ‘झिम्मा २’ या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंतने केले होते. आता क्षितीची मुख्य भूमिका असणारा व हेमंतने दिग्दर्शन केलेला ‘फर्स्टक्लास दाभाडे’ हा चित्रपट २४ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये क्षितीसह सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, राजन भिसे, हरिष दुधाडे, निवेदिता सराफ हे कलाकारदेखील दिसणार आहेत.