बॉलिवूडमधील अनुराग कश्यप हे खूप प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक आहेत. अनेकदा ते त्यांच्या रोखठोक वकतव्यांमुळे नेहमी चर्चेत असलेले बघायला मिळतात. व्यावसायिक आयुष्यामुळे त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर नेहमी चर्चा सुरु असते. त्याबरोबरच खासगी आयुष्यदेखील खूप प्रकाशझोतात आले आहे. अशातच आता एका नवीन कारणामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांनी मुंबई सोडणार असल्याचे भाष्य केले आहे. त्यामुळे सर्वत्र आता याबद्दल चर्चा होताना दिसून येत आहे. मात्र अनुराग असं का म्हणाले? याबद्दल सगळ्यांच्या मनात एक प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. तर आता अनुराग असं का म्हणाले? त्यांच्या म्हणण्याचा नक्की अर्थ काय? याबद्दल आपण जाणून घेऊया. (Anurag kashyap viral statement)
एका माध्यमाशी बोलताना अनुराग यांनी चित्रपट तयार करण्यासाठी होणाऱ्या खर्चाबद्दल भाष्य केले आहे. ते म्हणाले की, “माझ्यासाठी आता बाहेर जाऊन प्रयोग करणे कठीण आहे. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च होतो. यामुळे निर्माते फायदा व मार्जिनचा विचार करतात. चित्रपट तयार होण्याआधीच तो विकला कसा जाणार? याबद्दल चर्चा होते. त्यामुळे चित्रपट बनवण्याची ती मजा पूर्णपणे निघून जाते. त्यामुळे आता मुंबई सोडून जाणार आहे. मी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये जाणार. तिथे प्रेरणा मिळते”.
पुढे ते म्हणाले की, “मी असं केलं नाही तर मरेन. मी माझ्याच क्षेत्रामध्ये खूप निराश आहे. इथल्या मानसिकतेची मला किळस वाटते”. दरम्यान याचवेळी या वर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट ‘मंजुम्मेल बॉइज’ बद्दल भाष्य केले आहे. ते म्हणाले की, “हिंदीमध्ये असा चित्रपट कधीही बनणार नाही. पण जर या चित्रपटाला यश मिळाले तर या चित्रपटाचा रिमेक बनू शकतो. इथे ज्याला आधी यश मिळाले आहे त्याचा रिमेक बनवला जातो. काही नवीन करण्याचा प्रयत्न कोणीही करत नाही”.
याबरोबरच अनुराग यांनी टॅलेंट एजंसीवरदेखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “सध्याच्या पिढीबरोबर काम करणे खूप कठीण आहे. कारण त्यांना अभिनय करायचा नाही पण लगेच स्टार बनायचं आहे. एजंसी आधी कोणालाही स्टार बनवत नाहीत. पण ज्यावेळी स्टार बनतात तेव्हा त्यांच्याकडून खूप पैसा उकळतात”, असं त्यांनी सांगितलं आहे.