मराठी मनोरंजन क्षेत्रातील श्रेयस तळपदे हा लोकप्रिय अभिनेता आहे. मराठीबरोबरच तो अनेक हिंदी चित्रपटांमध्येही दिसून आला आहे. नुकताच तो ‘पुष्पा २’ या चित्रपटामुळे चर्चेत आला होता. ‘पुष्पा’ व ‘पुष्पा २’ या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारलेला अभिनेता अल्लू अर्जुनला हिंदी डबसाठी श्रेयसचा आवाज ऐकायला मिळतो. त्यामुळे मराठी, हिंदीबरोबरच त्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःची अशी एक वेगळी जागा निर्माण केली आहे. श्रेयस त्याच्या खासगी आयुष्याबाबत मात्र फारसा व्यक्त होत नाही. मात्र सध्या त्याच्या एका पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने बायको दीप्ती तळपदेबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. (shreyas talpade wedding anniversary)
श्रेयसचा आज लग्नाचा २० वा वाढदिवस आहे. ३१ डिसेंबर २००४ साली तो दीप्तीबरोबर लग्नबंधनात अडकला. आजवर दीप्तीने त्याला खूप साथ दिल्याचे अनेकदा श्रेयसने सांगितले आहे. अशातच त्याने एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने लग्नाच्या दिवशीचा व सध्याचा असे दोन फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने लिहिले की, “आज २० वर्ष झाली. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दीप्स. मला माझे आयुष्य जगण्याचा इतर कोणताही मार्ग माहीत नाही. पण तू नेहमी माझ्याबरोबर असशील. आय लव्ह यू. मी नेहमी करतो आणि करत राहीन”.
पुढे त्याने लिहिले की, “काही गोष्टी कधीही बदलत नाहीत. पहिला घास हा नेहमीच तुझा असेल”. या पोस्टवर अनेक नेटकरी व कलाकारांनी पसंती दर्शवली आहे. तसेच प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. अभिनेत्री सोनाली खरेने प्रतिक्रिया देत लिहिले की, “लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा”, क्रांती रेडकरनेदेखील शुभेच्छा दिल्या असून श्रेया बुगडे, प्रार्थना बेहेरे, मेघना एरंडे, संदीप पाठक यांनी इमोजी शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.
डिसेंबर २०२३ मध्ये श्रेयसला हृदयविकाराचा खूप मोठा झटका आला. ‘वेलकम टू जंगल’ चित्रपटाचे शूटिंग सुरु असताना त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर तो लगेच घरी पोहोचला तेव्हा त्याची पत्नी दीप्ती त्याला हॉस्पिटलमध्ये नेत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला. पत्नीने झटापटीने प्रसंगावधान राखल्यामुळे श्रेयसवर आलेले हे संकट दूर झाले.