एका मराठमोळ्या अभिनेत्याने नव्या वर्षात नवं घर घेतलं असल्याची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक आहे. प्रसादने नुकतंच नवीन घर घेतलं असल्याची खुशखबर चाहत्यांसह शेअर केली आहे. प्रसादने २०२४ या नव्या वर्षात पदार्पण करताच एक आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली. ती आनंदाची बातमी म्हणजे हक्काचं नवं घर. नव्यावर्षाच्या मुहूर्तावर त्याने त्याच्या कुटुंबियांसह नव्या घरात प्रवेश केला आहे. ‘ओक ११०२ व ११०३’ असे २ फ्लॅट अभिनेत्याने विकत घेतले आहेत. (Mangesh Desai On Prasad Oak)
आजवर प्रसादने त्याच्या भूमिकेसह अनेक चित्रपटांच्या दिग्दर्शनातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अनेक सुपरहिट सिनेमे प्रसाद ओकच्या नावे आहेत. ‘धर्मवीर’ चित्रपटातील त्याची आनंद दिघे साहेबांची भूमिका विशेष गाजली. यानंतर ‘धर्मवीर २’ साठी तो पुन्हा एकदा सज्ज झालेला पाहायला मिळत आहे. ‘धर्मवीर २’ च्या चित्रीकरणाला त्याने सुरुवात केली असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांनीही त्याच्या या भूमिकेला प्रचंड प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला आहे.
प्रसादने नवं घर घेतलं असून नुकताच त्याच्या नव्या घराचा गृहप्रवेश झाला. यावेळी त्याचा जिवलग मित्र मंगेश देसाई याने पत्नीसह हजेरी लावली होती. मंगेशनेही प्रसादला शुभेच्छा देत इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये मंगेश देसाई व त्याच्या पत्नीसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनानाथजी शिंदे यांनी देखील प्रसादच्या नव्या घरी उपस्थिती लावली. प्रसादच्या नव्या घरी मुख्यमंत्र्यानाही आमंत्रण होते. प्रसादने दिलेल्या या आमंत्रणाचा मान ठेवून मुख्यमंत्री साहेबांनी ओक कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली.
मंगेशने एकत्र फोटो शेअर करत त्याखाली कॅप्शन देत, “घराचं स्वप्न आपण सहज बघू शकतो पण ते पूर्ण होण्यासाठी खूप कष्ट, चिकाटी व असंच घर पाहिजे ही महत्वाकांक्षा ठेवली पाहिजे. प्रसाद तू व मंजूने ती ठेवली. आणि स्वप्न पूर्ण झालं. मी, शलाका व साहिलकडून तुझे अभिनंदन. मा .मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब नेहमीच मेहनत करणाऱ्या कलाकारांच्या पाठीशी असतात. तुझ्या विनंतीला मान देऊन साहेब घरी आले आणि तुला शुभेच्छा दिल्या. अजून काय केलं ते तू सांग. आपल्या सगळ्यांकडून त्यांचे आभार. जयहिंद, जय महाराष्ट्र. तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा” असं म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. मंगेश या पोस्टवर प्रसादने कमेंट करत, “आपला प्रवास एकत्रच सुरु झाला. दुसऱ्या शहरातून मुंबईत येऊन या क्षेत्रात स्थिरावण्यासाठी आपण काय काय केलंय ते तू चांगलंच जाणतोस. त्यामुळे या प्रवासाचे आपण एकत्र साक्षीदार आहोत.
तू आमच्या आनंदात सहभागी झालास. खूप खूप भारी वाटलं मित्रा” अशी कमेंट करत त्याचे आभार मानले आहेत.