मराठीमध्ये नव्या वर्षात नवनवीन चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. यामध्ये अगदी फॅमिली ड्रामापासून ते ऐतिहासिक चित्रपटांचा समावेश आहे. एकूणच काय तर यंदा प्रेक्षकांना मनोरंजनाची उत्तम मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. अशामध्येच आता एका गोड मराठी चित्रपटाने नव वर्षाची जोरदार सुरुवात झाली आहे. माधुरी दीक्षित प्रस्तुत ‘पंचक’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेले काही दिवस या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु होती. अखेरीस ५ जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये ‘पंचक’ दाखल झाला. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये गर्दी करत आहेत. (Madhuri Dixit On Instagram)
‘पंचक’चं प्रमोशनही अगदी जोरदार सुरु आहे. स्वतः माधुरी पती श्रीराम नेने यांच्यासह चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. विविध चित्रपटगृहांमध्ये जाऊन सिनेरसिकांशी स्वतः संवाद साधत आहेत. असाच एक व्हिडीओ माधुरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये माधुरी पती श्रीराम नेने यांच्याबरोबर चित्रपटगृहामध्ये गेलेली दिसत आहे. चित्रपटगृहामध्ये माधुरी पोहोचताच प्रेक्षकांनी एकच कल्ला केला. प्रेक्षकांचं मिळत असलेलं प्रेम पाहून तीही भारावून गेली.
यावेळी प्रेक्षकांनी माधुरी व श्रीराम नेने यांच्याकडे एक गोड हट्ट केला. दोघांनाही उखाणा घेण्यास सगळ्यांना भाग पाडलं. यावेळी माधुरी व नेने यांनी मराठीमध्ये उखाणा घेत उपस्थितांची मनं जिंकली. “पुणे तिथे काय उणे, इथे तर सगळंच झकास, श्रीराम रावांचं नाव घेते ‘पंचक’ बघणाऱ्यांसाठी खास”. असा उखाणा माधुरी यांनी घेतला. यावेळी सगळ्यांनी टाळ्या वाजवत माधुरीला भरभरुन प्रेम.
श्रीराम नेने यांनीही पत्नीसाठी खास उखाण घेत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. “भाजीत भाजी मेथीची माधुरी माझ्या प्रितीची” असा उखाणा त्यांनी घेतला. त्यांचं मराठी ऐकून प्रेक्षकही कौतुक करु लागले. या चित्रपटामध्ये आदिनाथ कोठारे, तेजश्री प्रधान, नंदिता धुरी आदी कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. आता माधुरीचा हा नवा मराठी चित्रपट कितपत कमाई करणार हे पाहावं लागेल.