विविध वाहिन्यांमधील अनेक विनोदी, सांगीतिक कार्यक्रम सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. त्या कार्यक्रमांबरोबरच कार्यक्रमातील स्पर्धकांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त दाद मिळत आहे. असाच एक कार्यक्रम जो प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे, तो म्हणजे स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार – छोटे उस्ताद २’. या कार्यक्रमाच्या यंदाच्या पर्वात अनेक गुणी स्पर्धक मिळाले असून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडला होता. नुकतंच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला. ज्यामध्ये जालन्याचा संकल्प काळेने सर्व स्पर्धकांना मागे टाकत कार्यक्रमाचे विजेतेपद पटकावले आहे. (Mi Honar Superstar Chhote Ustad 2 Grand Finale)
‘मी होणार सुपरस्टार – छोटे उस्ताद २’ या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. संकल्प काळे, श्रुती भांडे, श्रेया गाढवे, सृष्टी पगारे, रागिणी शिंदे आणि काव्य भोईर या सहा छोट्या उस्तादांमध्ये ही महाअंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत जालन्याच्या संकल्प काळेने बाजी मारत विजेतेपदावर आपले नाव कोरले. तर अकोल्याची श्रुती भांडे उपविजेती ठरली असून नाशिकच्या सृष्टी पगारेने तृतीय क्रमांक पटकावला. तर श्रेया गाढवे, रागिणी शिंदे आणि काव्य भोईर यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी गौरवण्यात आलेलं आहे.
हे देखील वाचा – “आई व्हायचं होतं पण…”, नेहा पेंडसेने केले Eggs Freeze, अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, “माझ्या नवऱ्यानेच मला…”
कार्यक्रमाचा विजेता ठरलेल्या संकल्पला ४ लाख रुपयांचं बक्षिस व सन्मानचिन्ह, तर अन्य विजेत्यांनासुद्धा सन्मानचिन्हाने गौरवण्यात आलं. यावेळी विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना संकल्प म्हणाला की, “मी आजवर बऱ्याच कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. मात्र छोटे उस्तादच्या मंचाने मला संधी दिली आणि मला माझं गायन कौशल्य सादर करता आलं. स्टार प्रवाहने दिलेल्या या संधीबद्दल मी आभारी असून इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे खूप आनंद होत आहे. या मंचाने सचिन पिळगावकर, वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे गुरुच्या रुपात दिले. या गुरुंकडून खूप काही शिकायला मिळालं.”
हे देखील वाचा – “ते बघून मला रडू आलं”, ३६ दिवस अमेरिकेत राहिल्यानंतर भारतात परतणार संकर्षण कऱ्हाडे; म्हणाला, “तिथे असणारी मराठी माणसं…”
संकल्पने जरी या कार्यक्रमात बाजी मारली असली, तरी कार्यक्रमातील अन्य स्पर्धकांनीही उत्तम कामगिरी केली आहे. या सर्व स्पर्धकांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.