सध्या गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र धामधूम सुरु आहे. सर्वसामान्यांपासून ते कलाकार मंडळींपर्यंत सगळेच जण बाप्पाच्या दर्शनासाठी जाताना दिसतात. अशातच मराठमोळा अभिनेताही बाप्पाच्या दर्शनासाठी गेला होता. मात्र दर्शनाला जात असताना हा अभिनेता वाट चुकला. हा मराठमोळा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. श्रेयसने नुकतंच दगडू शेठ हलवाई गणपतीच दर्शन घेतलं. दर्शनाला जात असताना मात्र श्रेयस वाट चुकला. दरम्यान श्रेयसला वाटेतच देव भेटला. याबाबतचा अनुभव त्याने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. (Shreyas Talpade Shared Experience)
श्रेयसने महाराष्ट्र पोलीस दलातील बापू वाघमोडे यांच्यासाठी ही पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत श्रेयसने लिहिले आहे की, “देव आपल्याला गूढ मार्गाने भेटतो, आज तो मला बापू वाघमोडेंच्या रूपाने भेटला. दगडू शेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जाताना आम्ही वाट चुकलो, त्यावेळी बापू वाघमोडे यांनी आम्हाला मार्ग समजावून सांगितला. तरीही आम्हाला नेमका रस्ता न समजल्याने त्यांनी स्वतः बाइकवरुन येत एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आम्हाला मार्गदर्शन केले, आम्ही पंडालपर्यंत पोहोचलो आहोत याची खात्रीही त्यांनी करून घेतली. धन्यवाद साहेब.”
त्याने पुढे लिहिले की, “देव हा आपल्या अवतीभवती आहे. या वस्तुस्थितीचा पुनरुच्चार करणारी ही आणखी एक घटना. आपण त्याला ओळखले पाहिजे, तो आपल्याला भेटतो, आपल्याला मदत करतो, मार्गदर्शन करतो, आपल्याशी बोलतो, आपल्याला तो तोच आहे हे ओळखणे गरजेचे आहे. प्रत्येकाशी अत्यंत आदराने वागा कारण कोणत्या रुपामध्ये देव आला असेल हे कधीच कळणार नाही. गणपती बाप्पा मोरया.”

श्रेयसने त्यांच्याबरोबर फोटो शेअर करत बापू वाघमोडे यांना या पोस्टमध्ये टॅग केले आहे. त्यानंतर बापू यांनी श्रेयसच्या पोस्टवर कमेंट करत ते श्रेयसचे मोठे फॅन असल्याचे सांगतिले. त्यांनी श्रेयसच्या फोटोवर कमेंट केली आहे की, “दादा खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. माझा फोटो पोस्ट केल्याबदल धन्यवाद. तेव्हा मला तुमच्याशी बोलताना सुचलं नाही की आम्ही दोघे नवरा बायको तुमचे मोठे फॅन आहोत. म्हणून आम्ही आमच्या मुलाचे नाव पण तुमच्या नावावरूनच ठेवले आहे- श्रेयस बापू वाघमोडे. जय हिंद.”