Nikhil Rajeshirke Wedding : मराठी सिनेविश्वात अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळाली. यंदाच्या वर्षात अनेक कलाकार लग्नबंधनात अडकलेले पाहायला मिळाले. एकामागोमाग एक कलाकार जोड्या लग्नबंधनात अडकत असल्याचं पाहायला मिळालं. प्रथमेश परब, शुभंकर एकबोटे, पृथ्वीक प्रताप, प्रथमेश परब, ही कलाकार मंडळी यावर्षी लग्नबंधनात अडकली. यापाठोपाठ आता आणखी एक कलाकार विवाहबंधनात अडकण्यास सज्ज झाला आहे. मराठी सुप्रसिद्ध अभिनेता लवकरच बोहोल्यावर चढणार आहे. हा अभिनेता म्हणजे अभिनेता निखिल राजेशिर्के.
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातील स्पर्धक व लोकप्रिय मराठी अभिनेता निखिल राजेशिर्के वैयक्तिक आयुष्यात नवीन प्रवासाला सुरुवात करत असल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्याच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. शिवाय त्याने प्री-वेडिंगचे फोटो शेअर करत लग्नबंधनात अडकणार असल्याची चाहूल दिली.
अभिनेत्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक फोटो रिपोस्ट करण्यात आला आहे. ही स्टोरी पाहून तो लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये मेहंदी लावतानाचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात त्याच्या लग्नाला फक्त तीन दिवस बाकी आहेत, असं म्हटलं आहे. निखिल चैत्राली मोरे हिच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. लग्नाआधी निखिल व चैत्रालीने वेस्टर्न अंदाजात प्री-वेडिंग शूट केलं. या फोटोशूटसाठी निखिलने काळा सूट तर त्याच्या होणाऱ्या पत्नीने लाल रंगाची साडी नेसली होती. दोघांचा हा वेस्टर्न अंदाज अधिक लक्ष वेधून घेत होता.
निखिलने यंदाच्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर साखरपुडा उरकला होता. त्याच्या साखरपुड्याचे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘रंग माझा वेगळा’, ‘अजूनही बरसात आहे’, या मालिकांमधून निखिलने महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. याशिवाय निखिल ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात सहभागी झाला होता. मात्र पहिल्याच आठवड्यात तो एलिमिनेट झाला होता.