चित्रपटांचा रिमेक होणं ही गोष्ट काही नवीन नाही. मराठी, हिंदी किंवा साऊथ प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये सर्रास रिमेक बनवले जातात. चित्रपटाची कथा जरी थोडीफार सारखी असली तरी त्या मध्ये अभिनय करणाऱ्या कलाकारांच्या कलेवर चित्रपटाचं यश ठरलेलं असत. असाच एक रिमेक काही वर्षांपूर्वी बनवला गेला होता पण इथेही कलाकाराच्या अभिनयाने रिमेकच्या रेस मध्ये बाजी मारली. ही गोष्ट आहे दादा कोंडके यांच्या एकटा जीव सदाशिव आणि दादांच्या चित्रपटाचा रिमेक होता जिस देस मे गंगा रहता है या नावाने बनवण्यात आला.(Dada Kondke Movie Remake)
दादा कोंडके यांचा “सोंगाड्या “नंतरचा चित्रपट “एकटा जीव सदाशिव “. आणि हा चित्रपट ३१ मार्च १९७२ रोजी पुणे शहरातील अलका थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. याच तारखेला पुणे शहरात चित्रपती व्ही. शांताराम निर्मित आणि दिग्दर्शित “पिंजरा ” प्रभात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या दोन्ही चित्रपटांना रसिकांनी पहिल्याच शोपासून हाऊसफुल्ल गर्दीत प्रतिसाद दिला. याला एकावन्न वर्ष पूर्ण होत आहेत.

“सोंगाड्या ” ची कथा पटकथा संवाद लिहिणारे वसंत सबनीस यांनीच “एकटा जीव सदाशिव ” चे लेखन केले आहे. सोंगाड्या चेच दिग्दर्शक गोविंद कुलकर्णी यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. “सोंगाड्या” प्रमाणेच याही चित्रपटाचे शूटिंग कोल्हापूरातील जयप्रभा स्टुडिओत झाले. नायक आणि नायिका अर्थात दादा कोंडके आणि उषा चव्हाण तसेच नायकाची आई रत्नमाला यांच्या या चित्रपटातही भूमिका. यासह या चित्रपटात गुलाब कोरगावकर, सुमन जगताप, मधु आपटे, शरद तळवळकर, बिपीन तळपदे, सरोज सुखटणकर, बी. माजनाळकर, भालचंद्र कुलकर्णी, गुलाब मोकाशी, मधु भोसले, वसंत खेडेकर इत्यादींच्या भूमिका आहेत.
हे देखील वाचा – अजय देवगणच्या त्या आयकॉनिक एन्ट्रीने दिलेली अनिल कपूरच्या ‘लम्हे’ला टक्कर
नेहमीप्रमाणे दादा ठरले वरचढ(Dada Kondke Movie Remake)
या चित्रपटात चार गाणी असून ती दादा कोंडके आणि जगदीश खेबूडकर यांनी लिहिली असून संगीत राम कदम यांचे आहे. जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी ही गाणी गायली आहेत. नग चालूस दुडक्या चाली, लबाड लांडग ढोंग करतेय, काल रातिला सपान पडलं, वर आभाळ खाली धरती ही ती गाणी आहेत. या चित्रपटाचे कला दिग्दर्शन सदाशिव गायकवाड, छायाचित्रण शंकरराव सावेकर आणि संकलन एन. एस. वैद्य यांचे आहे. त्या काळात टप्प्याटप्प्याने चित्रपट प्रदर्शित होत.

एकटा जीव सदाशिव या चित्रपटाचा दिग्दर्शक महेश मांजरेकरने “जिस देश मे गंगा रहता है ” या नावाने रिमेक केला. त्यात गोविंदा आणि सोनाली बेंद्रे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पण या चित्रपटाला मूळ चित्रपटाची रंगत आली नाही. याचे कारण म्हणजे, एकटा जीव…मधील दादा कोंडके यांच्या भाबड्या व्यक्तिरेखा आणि धांदरटपणा यांच्याशी प्रेक्षक जोडले गेले आणि चित्रपट आवडला.