मराठी मनोरंजन सिनेसृष्टीतील आघाडीचे निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते म्हणजे महेश मांजरेकर. ‘शिक्षणाचा आयचा घो’, ‘पांघरूण’, ‘दे धक्का’, ‘नटसम्राट’, ‘काकस्पर्श’ यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय, दिग्दर्शन व निर्मिती करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांनी केवळ मराठीचं नव्हे तर, हिंदी चित्रपटांची निर्मिती करत हिंदी प्रेक्षकांचेही मनोरंजन केले आहे. अशातच त्यांचा आगामी ‘जुनं फर्निचर’ हा नवीन चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. या चित्रपटातून ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वाविषयी व मुलांप्रती आई-वडीलांच्या असलेल्या अपेक्षांविषयी भाष्य करण्यात आले आहे. या ट्रेलर लॉंच सोहळ्यात संकर्षण कऱ्हाडेने त्यांना आई-वडिलांविषयी प्रश्न विचारला. तेव्हा महेश मांजरेकर हे आपल्या आई-वाडिलांविषयी बोलताना भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी संकर्षणच्या प्रश्नाला उत्तर देत महेश मांजरेकरांनी असं म्हटलं की, “आज माझे आई व वडील दोघेही नाही आहेत. त्यामुळे ते असताना मला जेव्हा जाणीव झाली तेव्हा मी त्यांना सॉरी म्हणालो नाही याचं मला वाईट वाटतं आणि ती खंत अजूनही आहे. त्यामुळे हा चित्रपट ज्यांचे आई-वडील आता हयात आहेत, त्यांच्यासाठीच आहे की त्यांना कधीच सॉरी म्हणायची वेळ येऊ नये.”
आणखी वाचा – नेत्राच्या हातून विरोचकाचाही अंत, देवी आईचा संकेत की अजून काही, मालिकेत पुढे काय घडणार?
यापुढे मुलांच्या वतीने असं म्हटलं की, “कोणतीच मुलं ही कधीच वाईट नसतात. आपण कधी मुद्दाम काही वागत नसतो. पण तरी छोट्या-छोट्या गोष्टींमधून आपण आपल्या आई-वडिलांना खूप गृहीत धरतो. त्यामुळे ते गृहीत धरणं नको, त्यांच्यासाठी हा चित्रपट आहे.” दरम्यान, येत्या २६ एप्रिल रोजी ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद व दिग्दर्शन महेश मांजरेकरांनी केले आहे. तसेच या चित्रपटात त्यांनी एक गाणेदेखील गायले आहे.