महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायमच चर्चेत असतात. उपमुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून लोक त्यांना ओळखत असले, तरी एक गायिका म्हणूनही त्यांनी कलाक्षेत्रात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमृता सोशल मीडियावरही तितक्याच सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्या अनेक फोटो शेअर करत त्यांच्या कामाविषयीची माहितीही देताना दिसतात. त्यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. अशातच त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत त्यांच्या नवीन गाण्याची माहिती दिली आहे. (Amruta Fadnavis On Instagram)
अमृता यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत त्यांच्या नवीन गाण्याबाबत चाहत्यांना सांगितलं आहे. “अत्यंत आनंददायी व प्रसन्न करणारे ‘तुम्हे आइने की जरुरत नहीं’ हे माझे गाणे प्रदर्शित झाले आहे’ असे म्हणत अमृता यांनी त्यांच्या चाहत्यांबरोबर हा खास व्हिडीओ शेअर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या या नवीन गाण्याची चर्चा होती आणि अखेर हे गाणे चाहत्यांच्या भेटीला आले आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे अमृता यांच्या ‘तुम्हे आइने की जरुरत नही’ या गाण्याची चांगलीच चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावरही हे गाणं चांगलंच व्हायरल होत आहे.
अशातच नेटकऱ्यांनी या गाण्यावर कमेंट्स करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. “खूप छान, तुमचा आवाज खूपच छान आहे, उत्कृष्ट गाणं” अशा अनेक कमेंट्स करत त्यांच्या गाण्याचे कौतुक केले आहे. या गाण्याला त्यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र काहींनी या गाण्यावर नकारात्मक कमेंट्स करत प्रतिक्रियाही दिल्या आहेत. “हे गाणं अंगाई गीत वाटत आहे, पैसे असतील तर कुणी काहीही करू शकतो, या गाण्याच्या फक्त ओळीच चांगल्या आहेत आवाज नाही, कर्कश आवाज” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी या गाण्याला त्यांची नापसंती दर्शवली आहे.

कधी ट्वीट केल्यामुळे तर, कधी गाण्यामुळे त्या चर्चेत असतात. आता त्यांचे ‘तुम्हे आईने की जरुरत नही’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. याआधीदेखील त्यांची काही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ‘अज मैं मूड बना लेया ए ए ए’, ‘तेरे नाल ही नचना वे!’, ‘शिव तांडव स्रोतम’, ‘वो तेरे प्यार का गम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’, ‘कुणी म्हणाले’, ‘तेरी बन जाऊंगी’ या त्यांच्या गाण्यांना लोकप्रियता मिळाली होती.