मनोरंजन सृष्टीत काम करणारे अनेक कलाकार मंडळी आपल्या कामाच्या शोधात मुंबईची वाट निवडतात. यादरम्यान मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांना चांगले-वाईट अनुभव येतच असतात. त्यात मुलगी किंवा स्त्रियांच्या वाटेला येणारे वाईट अनुभव हे अधिकच असतात. असाच काहीसा वाईट अनुभव अभिनेत्री वनिता खरातला आला होता आणि नुकतंच तिने याबद्दलचा खुलासा केला आहे.
छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांचा आवडता शो महाराष्ट्राची हास्यजत्रा. या शोमधून अभिनेत्री वनिता खरात घराघरात लोकप्रिय झाली. उत्तम अभिनय, हजरजबाबीपणा आणि विनोदाची अचूक जाण यामुळं वनितानं महाराष्ट्राची हास्यजत्राचा रंगमंच गाजवला. अशातच ‘असोवा’ दिलेल्या मुलाखतीत वनिताने तिच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे. तसेच हा किस्सा माझ्या आयुष्यातला खूप वाईट किस्सा असल्याचेही तिने यावेळी म्हटले.
हा किस्सा सांगताना वनिता असं म्हणाली की, “माझ्याबरोबर एक किस्सा झाला होता. मी माझ्या एक मैत्राणीला सोडायला दादरला गेले होते आणि आम्ही तिथेच गप्पा मारत एका कट्टयावर बसलो होतो. तर ती वॉशरूमला गेली होती. तेव्हा तिथे २ पुरुष आले आणि त्यांनी मला “नाशिकला जायची ट्रेन कधी असेल?” असं विचारलं. यावर मी त्यांना “तुम्ही प्लॅटफॉर्मला जाऊन विचारा” असं म्हटलं. यानंतर त्यांनी “दुसरी गाडी किंवा बस वगैरे असेल का?” याबद्दल विचारलं. यावर मी पुन्हा त्यांना “तुम्ही तिथे बस स्टँड आहे तर तिथे विचारा” असं म्हटलं.
यापुढे तिने असं म्हटलं की, “यानंतर ते २ मिनिटे तिथेच घुटमळले आणि त्यांनी मला थेट “इथे अशी काही सोय आहे का?” असं विचारलं. यावर मी त्यांना “अशी सोय म्हणजे?” असं विचारलं. यावर त्यांनी मला “अशी १ तासाची सोय वगैरे” असं उत्तर दिलं आणि त्याचं ते उत्तर ऐकून मी थंडचं पडले होते. कारण मी अशी मुलगी आहे की, त्याने मला अरे केलं असतं तर दुसऱ्या मिनिटाला मी त्याला कानाखाली मारली असती. पण तेव्हा मी त्याला काही बोलूच शकले नाही.”
आणखी वाचा – यंदाच्या ऑस्कर २०२४ सोहळ्यात नितीन चंद्रकांत देसाईंना आदरांजली अर्पण, उपस्थित मान्यवर व कलाकारही भावुक
यापुढे वनिता म्हणाली, “तेव्हा मला काय करावं हे सुचतच नव्हतं. तेवढ्यात माझी मैत्रीण आली आणि तिला येताना बघून ते तिथून निघून गेले. तेव्हा माझ्या मैत्रिणीने मला विचारलं की तुला काय झालं आहे आणि ती आल्यानंतर मला आत्मविश्वास आला. पण तेवढ्यात ते पसार झाले होते. तेव्हा मला ही काय मानसिकता आहे? किंवा त्यांना मला बघून असा प्रश्न विचारावा असं का वाटलं असेल? असा प्रश्न पडला. त्यामुळे हा माझ्या आयुष्यातला खूप वाईट किस्सा होता.”