मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या एका कारणामुळे चर्चेत आहे आणि या चर्चेचं कारण म्हणजे भाजप आमदार सुरेश धस यांनी तिच्या नावाचा केलेला चुकीचा वापर. आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेत धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती. प्राजक्ताचं नाव घेतल्यामुळे हे प्रकरण खूप चिघळलं असून या प्रकरणी आता प्राजक्ता माळीने कठोर पाऊल उचललं आहे. तिने सुरेश धस यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे. प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत याबाबत तिचं मत मांडलं आणि सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यांचा निषेध करत संताप व्यक्त केला. (Sachin Goswami supported Prajakta Mali)
बीडमध्ये बोलताना सुरेश धस यांनी, “मला जर इव्हेंट मॅनेजमेंट दिले, तर मी नाचायला प्राजक्ता माळी, सपना चौधरी, रश्मिका मंदाना यांना बोलवेन” असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर या सर्व प्रकरणी एकच गदारोळ झाला. या प्रकरणी प्राजक्ताने काल (शनिवार २८ डिसेंबर) रोजी पत्रकार परिषद घेत तिची भूमिका स्पष्ट केली. यानंतर प्राजक्ताच्या समर्थनार्थ अनेक मराठी कलाकार समोर आले आहेत.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक, लेखक सचिन गोस्वामी यांनीदेखील या प्रकरणी खास पोस्ट शेअर करत प्राजक्ता माळीला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “ज्या समाजात महिलांचा सन्मान राखला जातो तो समाज सभ्य समजता जातो. कलेचा आणि कलावंतांचा आदर जपणारा समाज सुसंस्कृत समाज असतो. प्राजक्ता माळीबाबत जे घडत आहे ते निषेधार्ह आहे. क्लेषदायक आहे. आपण निकोप सुदृढ समाजाचा आग्रह धरुया”.
आणखी वाचा – “तुम्हाला मिळालेली माहिती चुकीची”, करुण मुंडेंच्या आरोपांवर प्राजक्ता माळीचं भाष्य, म्हणाली, “चिखलफेक करुन…”
दरम्यान, प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत असं म्हटलं की, “गेल्या दिड महिन्यांपासून हा सगळा प्रकार सुरु आहे. गेले दिड महिने अत्यंत शांतपणे मी या सगळ्याला सामोरी गेली आहे. माझी शांतता म्हणजे माझी मुकसंमती नाही. मी, माझ्यासारख्या अनेक महिला कलाकार या सगळ्यांची ही हतबलता आहे. एक व्यक्ती कुठल्या तरी रागाच्या भरात बरळून जाते आणि त्यानंतर हजारो व्हिडीओ बनतात. एकमेकांना उत्तर देण्यामध्ये चिखलफेक होत राहते. महिलांची अब्रु निघते”.