राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित करुणा शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर करत खळबळ उडवून दिली होती. या व्हिडीओमध्ये काही तरुणींची नावं घेत करुणा शर्मा यांनी गंभीर आरोप केले होते. यात त्यांनी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नावाचाही उल्लेख केला होता. तसंच नुकतंच भाजप आमदार सुरेश धस यांनीही प्राजक्ताच्या नावाचा वादग्रस्त उल्लेख केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. सुरेश धस यांनी शनिवारी (दि.२८) मंत्री धनंजय मुंडेंवर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेतलं होतं. या प्रकरणानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळीने तीव्र संताप व्यक्त केला असून धस यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. (Prajakta Mali reacted on Karuna Sharma)
सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत उल्लेख केल्यानंतर संतापलेल्या प्राजक्ता माळीने मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी तिने सुरेश धस यांनी माफी मागावी, असं म्हटलं. तर करुणा शर्मा यांनी नोटीस पाठवली असल्याचे सांगितलं आहे. याबद्दल बोलताना प्राजक्ताने म्हटलं की, “मी करुणाताईंनाही विनंती करु इच्छिते की, तुम्ही स्वतः एक महिला आहात. महिलांना होणारा त्रास तुम्ही समजू शकता. या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये महिलाच जर महिलांच्या पाठीशी उभ्या नाही राहिल्या, चिखलफेक करु लागल्या तर कसं होणार?”
आणखी वाचा – उर्मिला कोठारेच्या गाडीची दोन मजुरांना धडक, एकाचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय झालं?
यापुढे प्राजक्ता म्हणाली की, “मी त्यांना हेही सांगते की, तुम्हाला माझ्याबाबत जी माहिती मिळाली आहे ती अत्यंत चुकीची आहे. यापुढे कोणत्याच गोष्टीचा पुरावा असल्याशिवाय तुम्ही बोलणार नाही अशी मला खात्री आहे. महिलांविषयी तुम्ही संवेदनशील राहाल अशी मी खात्री बाळगते. भविष्यातील मंडळीही आता विचार करतील की, मुलांना कलाक्षेत्रात पाठवायला नको”.
तर यापुढे प्राजक्ताने असं म्हटलं की, “आमचं कलाक्षेत्र बदनाम नाही. ही सगळी मंडळी त्याला बदनाम करतात. आम्ही मनोरंजन करण्याचं काम करतो. तुम्ही आमची नावं मनोरंजनासाठी वापरता. महिलांची नावं पटकन कशी तोंडावर येतात?. पुरुषांची नावं तुमच्या तोंडी येत नाहीत”. तसंच “या बाबतीत काहीतरी कठोर निर्णय झाले पाहिजेत आणि भविष्यात मला किंवा कला क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना अशा पद्धतीच्या गोष्टींना सामोर जायची वेळ येऊ नये यासाठी मी प्रयत्न करेन” असंही प्राजक्ताने म्हटलं.