मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहे, ज्यांनी त्यांच्या खुमासदार विनोदी शैलीने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या हास्यवीरांच्या यादीत एका कलाकारांचं नाव आवर्जून घेतलं जातं, ते नाव म्हणजे अभिनेता गौरव मोरे. स्टॅन्डअप कॉमेडी शोमधून छोट्या पडद्यावर पदार्पण करणारा गौरव आज ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचला. शिवाय, अफलातून विनोदी शैली व उत्तम अभिनयाने त्याने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. छोटा पडदा गाजवणारा गौरव आता मोठा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच त्याचा ‘अंकुश’ चित्रपट प्रदर्शित झाला. यानंतर तो लवकरच ‘बॉईज ४’ या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Gaurav More Dance in London)
‘बॉईज ४’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असून त्यानिमित्ताने चित्रपटाची टीम विविध ठिकाणी प्रमोशन करताना दिसत आहे. मात्र, आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असल्यामुळे तो चित्रपटाच्या टीमसह प्रमोशनमध्ये सहभागी झाला नाही. अशातच गौरवने चित्रपटाच्या शूटच्या काळातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो सध्या चर्चेत आला आहे.
गौरवने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये तो चित्रीकरणातून वेळ काढत लंडनच्या रस्त्यांवर डान्स करताना दिसला. ओपन बसमधून प्रवास करत असताना तो ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपटातील एका गाण्यावर खास शाहरुख खानच्या अंदाजात थिरकताना दिसला. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने ‘DDLJ Fever’ असं कॅप्शन दिलं आहे. त्याचबरोबर त्याच्या चाहत्यांना २० ऑक्टोबरला ‘बॉईज ४’ चित्रपट पाहण्याचे आवाहनही त्याने केलं. त्याचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला असून नेटकरी या व्हिडिओवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव करताना दिसले.
हे देखील वाचा – Video : ओंकार भोजनेने ‘तू दूर का?’ गाणं गाताच भर कार्यक्रमात नम्रता संभेरावला कोसळलं रडू, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान, गौरवचे या महिन्यात तब्बल तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ज्यातील ‘अंकुश’ चित्रपट कालच प्रदर्शित झाला, जो प्रेक्षकांचा पसंतीस उतरताना दिसत आहे. त्यानंतर ‘बॉईज ४’ व ‘लंडन मिसळ’ हे दोन चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. केवळ मराठीच नव्हे, तर ‘संगी’ या हिंदी चित्रपटातही तो झळकणार आहे. गौरव सध्या ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असून या चित्रपटात त्याच्यासह अभिनेता प्रसाद ओक झळकणार आहे.