पहिली संधी ही प्रत्येकासाठीच महत्त्वाची असते आणि या संधीचे सोनं करणं ही त्याहून महत्त्वाचे. मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांसाठी ही पहिली संधी महत्त्वाची असून या अनेक कलाकारांनी या संधीचे सोनंही केलं आहे. असंच संधीचं सोनं करणारा अभिनेता म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरे. विनोदाचं अचूक टायमिंग साधत त्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी शोमध्ये अनेक स्किट्समधून छोट्यामोठ्या भूमिका साकारत तो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
या शोमुळे दत्तू घराघरांत लोकप्रिय झाला असून त्याला आता वेगळी ओळखही मिळाली आहे. पण या शोमध्ये त्याला त्याच्या पहिल्या एण्ट्रीसाठी खूप संघर्ष करावा लागला होता आणि ही पहिली संधी जेव्हा त्याला मिळाली होती. त्या आदल्या रात्री अभिनेता रडला होता. त्याच्या या प्रसंगाबद्दल दत्तूने नुकतेच भार्गवी चिरमुले यांच्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. या मुलाखतीत दत्तूने त्याला महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये स्किट सादर करण्याची पहिली संधी कशी मिळाली? याबद्दलही सांगितले आहे.
यावेळी दत्तूने असं म्हटलं की, “या शोमध्ये येण्याआधीचा संघर्ष हा खूपच मोठा होता. अनेक एकांकिका व नाटकांमधून मी छोट्यामोठ्या भूमिका साकारत होतो. मग या शोमध्ये आल्यानंतर अनेक मोठ्या कलाकारांना अभिनय करताना बघत होतो. त्यामुळे आपल्यालाही अभिनय करण्याची संधी मिळावी असं वाटत होतं. मला पण यात छोटी एण्ट्री किंवा छोटी भूमिका करायची आहे हे सांगता येत नव्हतं. त्यामुळे ज्यादिवशी मला ही संधी मिळाली त्याच्या आदल्या दिवशी मी खूप रडलो होतो.
याबद्दल त्याने पुढे असं म्हटलं की, “खूप दिवस काहीही होतं नव्हतं. संधी मिळत नव्हती याचा खूप त्रास होतो. त्यामुळे एके दिवशी रात्री खूप भरून आलं होतं. तेव्हाच निखिल बने व विनायक पुरुषोत्तम यांचा फोन आला आणि आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो. तेव्हा विनायकने स्किटमध्ये “वेटरची एण्ट्री आहे? करशील का?” असं सांगितलं. यावर मी खूप खुश झालो आणि लगेच त्याला होकार कळवला. मग विनायकने तिथून लगेच मोटे सरांना फोन करून माझ्याबद्दल सांगितलं आणि मग मोटे सरही “हो चालेल” असं म्हणाले.
यापुढे दत्तू असं म्हणाला की, “स्किटच्या दिवशी मी चार वाजता उठलो होतो आणि तयार होऊन आपल्याला आज करूनच दाखवायचं आहे असं ठरवलं. मग तांत्रिक सरावाच्या दिवशी मी गेलो आणि मग ते स्किट झालं. ते स्किटही सरांना आवडलं आणि त्यांनी कौतुकही केलं.”