मराठा आरक्षणामुळे चर्चेत आलेलं नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगेंनी अनेकदा आवाज उठवला आहे आणि त्यांच्या याच संघर्षगाथेवर आधारित “आम्ही जरांगे” हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेले काही दिवस सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. अशातच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या ट्रेलरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या ट्रेलरमधून मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याचा संघर्ष दिग्दर्शकाने योग्य पद्धतीने चित्रीत केला असल्याचे पाहायला मिळत आहेत. मराठीतील अनेक कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात पाहायला मिळत आहे. अभिनेते मकरंद देशपांडे हे मनोज जरांगेंच्या मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. प्रसाद ओकने अण्णासाहेब जावळे पाटील यांची भूमिका साकारली आहे, माथाडी कामगार तर अण्णासाहेब पाटील यांच्या भूमिकेत अजय पूरकर आहेत.
याशिवाय सुबोध भावेम कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोंगडे, आरती त्रिमुखे आदी कलाकारही या चित्रपटात असणार आहेत. कलाकारांच्या भूमिकेबबरोबरच या ट्रेलरमधील “संघर्ष कधी एकटा दुकटा येत नाही पाटील”, “संघर्षाबिगर काही खरं नसतं”, “आता आपला लढा आपल्याच लोकांशी आहे” अशा अनेक संवादांनीही अनेकांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
मागील शंभर वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या चळवळीसाठी झटलेले आणि आपल्या जीवाचे बलिदान देणारे मराठा क्रांतिवीर यांचा न पाहिलेला इतिहास पहिल्यांदाच चित्रपट रुपात रूपेरी पडद्यावर येत असल्याने प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणीचं असणार आहे. येत्या १४ जुन २०२४ पासून ‘आम्ही जरांगे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे मराठा बांधवांसह अनेक प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.