छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने प्रेक्षकांना वेड लावलं. अनेकांच्या घरी हा कार्यक्रम आवर्जून पहिला जात असून कार्यक्रमातील प्रत्येक कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. या कार्यक्रमाने यात काम करणाऱ्या कलाकारांना वेगळी ओळख दिली. अभिनेता पृथ्वीक प्रतापदेखील याच कार्यक्रमातून प्रेक्षकांचा लाडका बनला. एकांकिकेमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या पृथ्वीकने अनेक मालिका, चित्रपट, वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. पण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील विविध व्यक्तिरेखांमुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. अशातच पृथ्वीकने नुकताच त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. (Prithvik Pratap new Home)
सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे प्रत्येक कलाकाराला वाटतं की, आपलं स्वतःच घर असावं. त्यासाठी ते आपापल्या परीने अनेक प्रयत्न करतात. आता पृथ्वीकचं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं असून त्याने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही बातमी त्याच्या चाहत्यांना दिली. पृथ्वीकने मुंबईत स्वतःचं घर खरेदी केलं असून त्या घराबाहेरचे काही फोटोज शेअर केले आहे.
पृथ्वीकने इन्स्टाग्रामवर त्याच्या नव्या घराचा एक फोटो शेअर केला. या फोटोजमध्ये त्याचे कुटुंबिय दिसत असून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. हा फोटो शेअर करताना तो म्हणाला, “आजवर अनेक स्वप्न पाहिली, ती पूर्ण केली, अनेक स्वप्न जगली आणि ती भंगली सुद्धा. पण एक स्वप्न जे आजपर्यंत हुलकावणी देत होतं ते अखेर पूर्णत्वाला आलं… आयुष्याची ३० वर्षे आश्रितासारखी काढलेल्या प्रत्येकाला एक दहा बाय दहाचं छप्पर ही आभाळापेक्षा कमी नसतं. आज स्वतःच्या घरापुढे उभं राहून हा फोटो काढताना खरच आभाळ ठेंगण झाल्यासारख वाटतंय. घर छोटं आहे पण माझ्या कुटुंबाचं आहे. ही स्वप्नपूर्तीची वाटचाल अजून अशीच सुरु राहणार आहे कारण ‘Penthouse’ अभी बाकी है मेरे दोस्त…!”
हे देखील वाचा – स्वॅग, स्टाईल अन्…; प्रसाद खांडेकरच्या लेकाचा शाहरुख खानच्या गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ तुफान व्हायरल
“गंमत म्हणजे आज २ नोव्हेंबरला हे घर माझ्या नावावर झालंय म्हणजे ‘शाहरुख खान’च्या वाढदिवशी. त्यामुळे माझी ‘मन्नत’ पूर्ण झाली, असं म्हणायला हरकत नाही. हे घर मिळण्यासाठी अनेकांची निस्वार्थ मदत झाली, त्या प्रत्येकाचा मी आयुष्यभर ऋणी राहीन.”, असं तो या पोस्टमध्ये म्हणाला. त्याच्या या पोस्टवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी “खूप भरभराट होवो ही सदिच्छा”, असं म्हणत त्याचे अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर कार्यक्रमातील सह कलाकारांसह मालिकाविश्वातील अन्य कलाकारांनी त्याचे अभिनंदन केले. त्याचबरोबर चाहतेसुद्धा यावर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहे.
हे देखील वाचा – Video : एका दुचाकीवर चार माणसं, अजिंक्य देव यांनी व्हिडीओ शेअर करत दाखवली ‘ती’ सत्य परिस्थिती, म्हणाले, “गाडी ठोकणार पण…”

पृथ्वीकने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’व्यतिरिक्त ‘जागो मोहन प्यारे’, ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ या मालिकांमध्ये काम केलेलं आहे. तसेच ‘क्लास ऑफ ८३’ या हिंदी वेबसीरीजमध्येही तो झळकला होता. लवकरच पृथ्वीक ‘डिलिवरी बॉय’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. चित्रपटाची शूटिंग नुकतंच पूर्ण झाली असून या चित्रपटाची अभिनेत्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहे.